समाजकल्याणच्या १.७८ कोटींच्या योजनांना मंजूरी !
By संतोष येलकर | Published: July 11, 2024 09:16 PM2024-07-11T21:16:37+5:302024-07-11T21:17:07+5:30
जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची सभा; अर्ज करण्याची मुदत ३१ जुलैपर्यत
अकोला: जिल्हा परिषद सेस फंडातून समाजकल्याण विभागामार्फत १ कोटी ७८ लाख रुपयांच्या निधीतून विविध सात योजना राबविण्यास गुरुवारी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजूरी देण्यात आली असून, संंबधित योजनांसाठी जिल्हयातील सातही पंचायत समितीस्तरावर लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची मुदत येत्या ३१ जुलैपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद २० टक्के उपकरातून (सेस फंड) दुधाळ जनावरांचे वाटप, मंडप व लाऊडस्पीकर संच वाटप, पिको मशीन, इलेक्ट्रीक पंप, पीव्हीसी पाइप इत्यादी साहित्या वाटपाच्या सहा योजना आणि ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीतून दिव्यांगांना उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत व दिव्यांगांशी विवाह सानुग्रह अनुदान या दोन योजनांसह एकूण आठ योजना १ कोटी ७८ लाख रुपयांच्या निधीतून राबविण्यात येत आहेत.
या योजनांसाठी जिल्हयातील लाभार्थ्यांकडून येत्या ३१ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे या सभेत ठरविण्यात आहे. समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या मुद्दयावर सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समितीचे सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, प्रशांत अढाऊ, गोपाल दातकर, सुदीप सरदार, आम्रपाली गवारगुरु, लीना शेगोकार, माया कावरे, निता गवइ, सुमन गावंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.समाजकल्याणच्या १.७८ कोटींच्या योजनांना मंजूरी !