राज्यातील ८,३७४ बीजोत्पादकांना भाव फरकापोटी १८ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:41+5:302021-07-01T04:14:41+5:30
अकोला : महाबीजकडून बीजोत्पादकांना किमान आधारभूत किंमत व कृषी उत्पन्न बाजार समितीत आधारित मूळ दर यामधील फरकाची रक्कम देण्यात ...
अकोला : महाबीजकडून बीजोत्पादकांना किमान आधारभूत किंमत व कृषी उत्पन्न बाजार समितीत आधारित मूळ दर यामधील फरकाची रक्कम देण्यात येते. यावर्षी राज्यातील ८,३७४ बीजोत्पादकांच्या खात्यात १८ कोटी ७९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रकमेची शासनाकडे मागणी केली असल्याचे ‘महाबीज’कडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून बियाणांसाठी शेतकऱ्यांकडून तूर, हरभरा, करडई, मूग खरेदी केली जाते. खरीप व रब्बी हंगामात हा बीजोत्पादन प्रकल्प राबविला जातो. या प्रकल्पात शेतकऱ्यांना बाजार समितीत असलेले त्यावेळचे दर आणि शासनाने घोषित केलेल्या किमान आधारभूत किमतीमधील तफावत रक्कम नंतर दिली जाते. त्यासाठी ‘महाबीज’कडून शासनाला प्रस्ताव पाठविला जातो. या दोन किमतीमधील तफावत ही बोनस म्हणून शेतकऱ्यांना मिळते. त्यानुसार महाबीजच्या राज्य व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या बियाणांसाठी फरकाची रक्कम म्हणून २५ कोटी ७० लाख रुपये रक्कम अदा करणे आहे. यातील १८ कोटी ७९ लाख रुपयांची रक्कम वितरित केली आहे.
६ कोटी ९१ लाख देणे बाकी!
राज्यातील बहुतांश बीजोत्पादकांना भाव फरकापोटी रक्कम अदा करण्यात आली आहे; परंतु अद्यापही ६ कोटी ९१ लाख रुपये रक्कम देणे बाकी आहे. या रकमेसाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.
२५ टक्के अधिक रकमेचा समावेश
शासन धोरणानुसार बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे दर पडल्यास हमीभाव गृहीत धरून त्यात २५ टक्के अधिक रकमेचा समावेश करून शेतकऱ्यांना फरकाची रक्कम बियाणे महामंडळाला द्यावी लागते.
बीजोत्पादकांना दिलेली रक्कम
१८ कोटी ७९ लाख
एवढ्या शेतकऱ्यांना रक्कम अदा
८,३७४
गतवर्षी हमीदरापेक्षा कमी मोबदला
गतवर्षी बाजार समित्यांमध्ये शेत मालाचे दर पडल्याने हरभरा बीजोत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या हमीदरापेक्षा कमी मोबदला मिळाला होता. त्यात राज्यात हरभरा, तूर, करडई व मुगाचे बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होता.