१८ कोटीतून होणार रस्ते, उद्यानांचे सौंदर्यीकरण!
By admin | Published: April 12, 2017 01:51 AM2017-04-12T01:51:05+5:302017-04-12T01:51:05+5:30
पालकमंत्र्यांचा पाठपुरावा; बांधकाम विभागाकडून निविदा प्रकाशित
अकोला: नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी २४ कोटी ९३ लाख रुपये निधी शासनाने मंजूर केला होता; मंजूर निधीत शहरातील ठोस ५८ कामांचा समावेश असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने १८ कोटींच्या कामाची निविदा प्रकाशित केली आहे. यामध्ये नेकलेस रस्त्यासह प्रमुख रस्ते व उद्यानांच्या सौंदर्यीकरणाचा समावेश आहे.
शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून निधीचा ओघ सुरू असल्याचे चित्र आहे. मूलभूत सुविधेंतर्गत शहरासाठी २५ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला. या निधीतून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागातील ठोस विकास कामे निकाली काढल्या जाणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीत निधीचे विनियोजन केले जाणार असून, कार्यान्वयन यंत्रणा महापालिका प्रशासन राहील. २५ कोटींपैकी १८ कोटी रुपयांतून होणाऱ्या कामाच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रकाशित केली असून, २८ एप्रिलपर्यंत आॅनलाइन पद्धतीने निविदा सादर करावी लागेल. ही कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ७ कोटींच्या कामाची निविदा काढली जाईल.
या उद्यानांचा होईल विकास
भाऊसाहेब गोडबोले उद्यान, संतोष नगरमधील बगिचा, माधव नगरमधील उद्यान, इंद्रायणी गतिमंद मैदान वॉकिंग ट्रॅक, हिराबाई ले-आउट ते आदर्श कॉलनी ओपन स्पेसमध्ये वॉकिंग ट्रॅक, सरकारी बगिचा येथे वॉकिंग ट्रॅक, सौंदर्यीकरण, जवाहर नगर चौक येथे वॉकिंग ट्रॅक व सौंदर्यीकरण, मोरेश्वर कॉलनी येथील बगिचाचे सौंदर्यीकरण आदी कामांचा समावेश आहे.
५० टक्क्यांची अट वगळली
मूलभूत सुविधेंतर्गत प्राप्त निधीमध्ये महापालिकेला एकूण निधीच्या ५० टक्के हिस्सा जमा करावा लागतो. त्यानंतर शासनाची मंजुरी मिळते. या ठिकाणी मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती ध्यानात घेता ५० टक्के निधीची अट शिथिल करून १०० टक्के निधी देण्याची तरतूद नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केली. त्यानुषंगाने ‘पीडब्ल्यूडी’मार्फत निविदा काढण्यात आल्याची माहिती आहे.
कॅनॉल रोडचे भिजत घोंगडे कायम
शासनाने मंजूर केलेल्या निधीतून जुने शहरातील कॅनॉल रोड ते जुना बाळापूर नाका ते राष्ट्रीय महामार्गालगतच्या नवीन किराणा मार्केटपर्यंतच्या रस्त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्याच्या हस्तांतरणाचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असले तरी ही प्रक्रिया थंड बस्त्यात सापडली आहे.
नेकलेस रस्ता चकाकणार!
विकास कामांसाठी प्राप्त २५ कोटींच्या निधीतून नेकलेस रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचा केला जाईल. रस्त्यालगतचे विजेचे खांब हटवून नेहरू पार्क ते सिव्हिल लाइन चौक ते रतनलाल प्लॉट चौकपासून थेट दुर्गा चौक-स्टेट बँक आॅफ इंडिया (बिर्ला गेट) पर्यंत काँक्रिटीकरण केले जाईल. यासाठी ५ कोटी १८ लाख १८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. काँक्रिटीकरण केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला नाली व फुटपाथचा समावेश करण्यात आला आहे. रस्त्याची रुंदी १५ मीटर केली जाईल.