अकोल्यात एमबीबीएस प्रथम वर्षाचे १८ विद्यार्थी पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:59+5:302021-02-16T04:19:59+5:30
गत वर्षीच्या कोविड काळानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे नवे सत्र नुकतेच सुरू झाले. एमबीबीएसच्या प्रथम वर्षीय अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वर्गही ...
गत वर्षीच्या कोविड काळानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे नवे सत्र नुकतेच सुरू झाले. एमबीबीएसच्या प्रथम वर्षीय अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वर्गही सुरू झालेत, परंतु याच दरम्यान जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसंख्येतही वाढ होऊ लागली. सर्वकाही सुरळीत सुरू असताना गत आठवडाभरापासून जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. अशातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील १८ विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वच विद्यार्थींचा प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
१८२ विद्यार्थ्यांचे अहवाल निगेटिव्हएमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील २०० पैकी १८ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे उर्वरित विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी केली. या १८२ विद्यार्थ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने विद्यार्थ्यांसह महाविद्यालय प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला.
अभ्यासवर्ग सुरू
एमबीबीएस अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या आनुषंगाने अभ्यास वर्ग नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने घेतला आहे.
एमबीबीएसचे १८ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित १८२ विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटिव्ह असून, त्यांचे अभ्यासवर्ग नियमित सुरू आहेत.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला