तेल्हाऱ्यात रेशनचा १८ क्विंटल गहू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:35+5:302021-09-03T04:20:35+5:30
२ सप्टेंबर रोजी दुपारी तेल्हारा पोलिसांना रेशन दुकानातील गहू बेकायदेशीररित्या मोजल्या जात असून काळ्या बाजारात जात असल्याची गुप्त माहिती ...
२ सप्टेंबर रोजी दुपारी तेल्हारा पोलिसांना रेशन दुकानातील गहू बेकायदेशीररित्या मोजल्या जात असून काळ्या बाजारात जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ निकेश सोळंके, केशव भारसाकळे यांनी नाकेबंदी करून एमएच ३० एव्ही १००७ क्रमांकाचा मिनी ट्रक पकडला. ट्रकचा चालक नीलेश अंबादास भड रा. तळेगाव बाजार ता. तेल्हारा याच्या ताब्यातून १७ ते १८ क्विंटल गहू किंमत ४२ हजार २०० रुपये व वाहनांची किंमत १ लाख ५० हजार असा मुद्देमाल जप्त केला. पुरवठा निरीक्षक नीलेश कात्रे यांच्या तक्रारीनुसार आरोपी नीलेश भड याच्या विरुद्ध कलम एसी ॲक्ट 3, 7, नुसार गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणात मुख्य आरोपी हा चालक नसून दुसराच असल्याची माहिती मिळाली असून पोलीस किंवा महसूल विभाग तपासात मुख्य आरोपीपर्यंत पोहाेचतात काय, हे लवकरच दिसून येईल.
रेशनचा गहू कोठे जाणार होता?
पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू जप्त केला. वाहनचालकास अटक केली. परंतु हा रेशनचा गहू कोणत्या रेशन दुकानातून काळ्या बाजारात जाणार होता आणि कोणाला हा गहू विकण्यात आला. याचा खुलासा मात्र झाला आहे. परंतु पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास, संबंधित रेशन दुकानदार व रेशनचा गहू खरेदी करणाऱ्या आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचता येऊ शकते.