१८ हजारांवर तक्रारींचे निवारण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:15 AM2017-08-04T02:15:16+5:302017-08-04T02:17:17+5:30
अकोला : महावितरण ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध असते. यासाठी सातत्याने ‘महावितरण आपल्या दारी’सारखे नवनवीन उपक्रम महावितरण राबवित असते. याचाच एक भाग म्हणून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी राज्यभरातील ग्राहकांसाठी ग्राहक संपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यभरात राबविलेल्या ग्राहक संपर्क अभियानात सुमारे १८ हजार ५५५ ग्राहकांच्या तक्रारी व अर्जांचे तत्काळ निराकरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महावितरण ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध असते. यासाठी सातत्याने ‘महावितरण आपल्या दारी’सारखे नवनवीन उपक्रम महावितरण राबवित असते. याचाच एक भाग म्हणून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी राज्यभरातील ग्राहकांसाठी ग्राहक संपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यभरात राबविलेल्या ग्राहक संपर्क अभियानात सुमारे १८ हजार ५५५ ग्राहकांच्या तक्रारी व अर्जांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. महावितरणच्या राज्यभरातील १६ परिमंडळांमध्ये जुलै महिन्यात हे ग्राहक संपर्क अभियान राबविण्यात आले. यांतर्गत राज्यभरात १,७४६ ग्राहक मेळावे घेण्यात आले. या ग्राहक संपर्क अभियानात वीज ग्राहकांसाठी नवीन वीज जोडणी, नावात बदल, वीजभार बदलणे या अर्जांवर कार्यवाही करण्यात आली, तसेच सदोष किंवा चुकीच्या वीज बिलांची दुरुस्ती, सदोष किंवा जळालेले मीटर बदलण्यासह इतर तक्रारीही जागेवरच सोडविण्यात आल्या. राज्यात या अभियानांतर्गत एकूण सुमारे २२ हजार ९६६ तक्रारी व अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १८ हजार ५५५ तक्रारी, अर्जांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. उर्वरित ४ हजार ४११ प्रलंबित तक्रारी निर्धारित मुदतीत सोडविण्यात येत असून, त्याची माहिती संबंधित वीज ग्राहकांना देण्यात येत आहे. महावितरणच्या ग्राहक संपर्क अभियानाला संपूर्ण राज्यात वीज ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला, तसेच या अभियानात नवीन वीज जोडणी, इतर वीज सेवेविषयक तक्रारी तत्काळ सोडविण्यात आल्यामुळे वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सर्वाधिक तक्रारी सदोष मीटर रिडिंगच्या
राज्यभरात घेण्यात आलेल्या या ग्राहक मेळाव्यांमध्ये एकूण तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी सदोष किंवा चुकीच्या वीज बिलिंगबाबत होत्या. त्यावर महावितरणकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासंदर्भात वारंवार चुकीचे रिडिंग घेणार्या एजन्सीवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश संजीव कुमार यांनी दिले आहेत.