१८00 १११ ३२१ : रेल्वेची नवी हेल्पलाईन
By admin | Published: December 8, 2014 11:47 PM2014-12-08T23:47:10+5:302014-12-08T23:47:10+5:30
आता निकृष्ट खाद्यपदार्थांची बिनधास्त करा तक्रार!
राम देशपांडे/अकोला
रेल्वे गाड्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर विकण्यात येणार्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता चांगली ठेवण्याचा दृष्टीकोनातून भारतीय रेल्वे प्रशासनाने १८00१११३२१ या क्रमांकाची नवीन हेल्पलाईन सुरू केली असून, या हेल्पलाईनवर केंद्रीय रेल्वे प्रशासनाचं नियंत्रण राहणार आहे.
रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नियुक्त केलेल्या अधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांमार्फत (वेंडर्स) निकृष्ट खाद्यपदार्थ विकण्याचे प्रकार अलिकडच्या काळात मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. प्रशासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा वजनात कमी भरणारे व निर्धारित दरांपेक्षा जास्त दराने खाद्यांन्नांची विक्री होत असल्याच्या तक्रारीही रेल्वे प्रशासनाला मोठय़ा प्रमाणात प्राप्त झाल्यात. रेल्वेच्या यापूर्वीच्या अर्थसंकल्पात यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीकोनातून विशेष तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार भारतीय रेल्वे प्रशासनाने १८00 १११ ३२१ या क्रमांकाची नवी हेल्पलाईन सुरू केली आहे. तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याच्या दृष्टीकोनातून या हेल्पलाईन क्रमांकावर येणार्या येणारे फोन कॉल्स रेकॉर्ड केले जाणार आहेत. याशिवाय धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये वितरित केल्या जाणार्या जेवणाची व इतर खाद्यपदार्थांंची गुणवत्ता चांगली आहे की वाईट, याची खातरजमा करून घेण्यासाठी विशेष गाड्यांमध्ये प्रवास करणार्या नागरिकांकडून फोन कॉल्स रेकॉर्ड करणार्या अंतर्गत प्रणालीद्वारे प्रतिक्रिया जाणून घेतल्या जाणार आहेत. एका त्रयस्थ कॅटरिंग सर्व्हिसकडून प्रत्येक विभागात या प्रणालीचे वेळोवेळी ऑडिट केले जाणार आहे.
विविध विभागांमध्ये नोव्हेंबर २0१२ ते ऑक्टोबर २0१४ दरम्यानच्या कालावधीत धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना अत्यंत निकृष्ट जेवण देण्यात आल्याची १९६ प्रकरणं रेल्वे प्रशासनासमोर आली आहेत. त्यापैकी ५२ प्रकरणांमध्ये दंड ठोठावण्यात आला आहे.