१८७९ सिंचन विहिरींचा होणार पंचनामा!
By Admin | Published: June 4, 2016 02:20 AM2016-06-04T02:20:55+5:302016-06-04T02:20:55+5:30
अकोला जिल्हाधिका-यांचा चारही एसडीओंना आदेश.
संतोष येलकर / अकोला
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात गत वर्षभराच्या कालावधीत करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांची तपासणी करून पंचनाम्यासह वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी १ जून रोजी जिल्ह्यातील चारही उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांना दिला. त्यानुसार जिल्ह्यातील १ हजार ८७९ सिंचन विहिरींच्या कामांचा पंचनामा महसूल विभागाच्या पथकांकडून करण्यात येणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे केली जातात. मंजूर करण्यात आलेल्या विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार, अकोला जिल्ह्यात मेअखेर करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांपैकी किती बोगस आहेत, सिंचन विहिरी गायब करण्यात आल्या काय, विहिरींचे काम न करता त्या कागदोपत्री दाखवून अनुदानाची रक्कम काढण्यात आली काय,अनुदान आणि मजुरी रकमेचे वाटप करण्यात आले की नाही, याबाबत तपासणी होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मे २0१६ अखेर वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात करण्यात आलेल्या १ हजार ८७९ सिंचन विहिरींच्या कामांची तपासणी महसूल अधिकारी-कर्मचार्यांच्या पथकांकडून करण्यात येणार आहे. या तपासणीत सिंचन विहिरींच्या कामांचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार उपविभागीय अधिकार्यांना १ जून रोजी दिला.
विहिरींच्या कामांचे पंचनामे ७ जूनपर्यंत पूर्ण करून, पंचनाम्यासह अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी अकोला, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर उपविभागीय अधिकार्यांना दिला.