वाडेगाव दंगल प्रकरणातील १९ आरोपी निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:30 PM2019-05-31T12:30:18+5:302019-05-31T12:30:21+5:30
गावात उसळलेल्या जातीय दंगलीतील १९ आरोपींची सबळ पुराव्याअभावी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
अकोला - वाडेगाव येथे २००७ मध्ये पोलीस चौकीत उपस्थित असताना वाडेगावचे माजी सरपंच तथा शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र मानकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर गावात उसळलेल्या जातीय दंगलीतील १९ आरोपींची सबळ पुराव्याअभावी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. दरम्यान, याप्रकरणी माजी सरपंचावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा खटला न्यायालयात सुरु असून, त्याची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीनावर सुटका केली आहे.
वाडेगाव येथे २० फेब्रुवारी २००७ रोजी वाडेगाव येथील शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा वाडेगावचे तत्कालीन सरपंच राजेंद्र मानकर यांच्यावर पोलीस चौकीत प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी जनक्षोभातून गावातील दोन गटात दंगल उसळून मोठ्या प्रमाणात घरांची जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बाळापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने दोन्ही गटातील साक्षीदार तपासल्यानंतर या प्रकरणातील १९ आरोपिंची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. मोहन मोयल, चंद्रकांत थानवी यांनी कामकाज पाहिले.