१९ विकास कामांच्या निविदा रद्दची तयारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:07 AM2017-08-04T02:07:12+5:302017-08-04T02:12:16+5:30
अकोला : आधीच जिल्हा परिषदेच्या योजना, विकास कामांचा बोजवारा उडालेला असताना काही पदाधिकारी आणि अधिकार्यांच्या मर्जीतील ठरावीक कंत्राटदारांना कामे मिळत नसल्याचा अंदाज आल्याने निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची तयारी बांधकाम विभागाने चालविली आहे. याप्रकरणी निर्णय घेणार्या समितीपुढे तसा प्रस्ताव मांडल्याने १९ पैकी तीन कामे वगळता इतर कामांच्या निविदा रद्द होण्याची शक्यता आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निविदा रद्द होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे.
सदानंद सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्हा वार्षिक निधीतून जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतून मंजूर कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्यामध्ये खुले कंत्राटदार आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी प्रत्येकी सात तर मजूर सहकारी संस्थांसाठी पाच कामे ठेवण्यात आली. त्यानुसार १९ कामांसाठी मोठय़ा प्रमाणात निविदाधारकांनी सहभाग घेतला. निविदेतील वेळापत्रकानुसार २३ जुलै रोजी कंत्राटदारांच्या पात्रतेच्या निकषाचे बंद पाकीट उघडण्यात आले. त्यानंतर कामांच्या दराचे पाकीट उघडणे अद्यापही बाकी आहे. कंत्राटदारांची पात्रता ठरविताना त्यांना ३१ मार्च २0१७ पर्यंंंतचा व्हॅट क्लीअर असल्याची अट ठेवण्यात आली. त्यापैकी अनेकांनी तसे प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे काम घेणार्यांमध्ये दराची स्पर्धा होणे आवश्यक आहे; मात्र स्पर्धेसाठी आवश्यक सहभागी निविदाधारकांची संख्या कमी आहे, असे कारण देत १९ पैकी १६ कामांची निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे पाठविला. त्यांच्या मंजुरीनंतर बांधकाम विभागाचे नियंत्रण अधिकारी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्याकडे निर्णयासाठी प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या निर्णयावर निविदा रद्द होणे, प्राप्त निविदाधारकांपैकी निवड होणे, या बाबी अवलंबून आहेत.
रद्द होणार्या निविदा प्रक्रियेतील कामे
पोपटखेड येथे वैद्यकीय अधिकारी निवासस्थान, वरूर विटाळी रस्ता, हिवरखेड रस्ता काँक्रिटीकरण, मेडशी-अंधारसावंगी रस्ता, शेळद जोडरस्ता, अडगाव येथे वैद्यकीय अधिकारी निवासस्थान, वडाळी देशमुख-रंभापूर रस्ता डांबरीकरण, अंत्री मलकापूर-शिंगोली रस्ता खडीकरण, देऊळगाव-वडाळी देशमुख रस्ता खडीकरण, कोळविहीर रस्ता डांबरीकरण, सुकोडा रस्ता डांबरीकरण, बाभूळगाव-आलेगाव स्लॅबड्रेन बांधकाम, भटोरी जोडरस्ता, डोंगरगाव-उरळ नवीन रस्ता, कळंबा जोडरस्ता, काटेपूर्णा रस्ता, कुरूम रेल्वे स्टेशन, पिंजर-भेंडीकाजी रस्ता मजबुतीकरण.या कामांचा समावेश आहे.