मुख्यमंत्री पेयजलमधून अमरावती विभागातील १९ योजनांना डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:59 PM2018-04-20T13:59:22+5:302018-04-20T13:59:22+5:30

अकोला : ग्रामीण भागात स्वच्छ व पुरेसे पाणी देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात निवड झालेल्या अमरावती विभागातील १९ पाणी पुरवठा योजना वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

19 schemes drops in Amravati division from Chief Minister drinking water scheme | मुख्यमंत्री पेयजलमधून अमरावती विभागातील १९ योजनांना डच्चू

मुख्यमंत्री पेयजलमधून अमरावती विभागातील १९ योजनांना डच्चू

Next
ठळक मुद्देवगळलेल्या योजनांमध्ये अमरावती विभागातील १९ योजना आहेत, तर नव्याने एकाही योजनेचा समावेश झालेला नाही. त्या योजना व्यवहार्य नसल्याच्या तसेच इतर कार्यक्रमातून त्या होत असल्याच्या सबबीखाली वगळण्यात आल्या, असे शासनाचे म्हणणे आहे.  

- सदानंद सिरसाट
अकोला : ग्रामीण भागात स्वच्छ व पुरेसे पाणी देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात निवड झालेल्या अमरावती विभागातील १९ पाणी पुरवठा योजना वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पाच योजनांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदांकडून प्राप्त प्रस्तावांनुसार योजनांना मंजुरी देणे, वगळणे, नव्या योजना समाविष्ट करण्यासाठी राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीला अधिकार देण्यात आले. त्या समितीने आधी मंजुरी देत निधीची तरतूद केलेल्या तब्बल ११९ योजना मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २६२ कोटी ६३ लाख ४४ हजार रुपये एवढा निधी खर्च अपेक्षित होता. त्या योजना वगळून नव्याने २५ योजनांचा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांचा समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे, वगळलेल्या योजनांमध्ये अमरावती विभागातील १९ योजना आहेत, तर नव्याने एकाही योजनेचा समावेश झालेला नाही. त्या योजना व्यवहार्य नसल्याच्या तसेच इतर कार्यक्रमातून त्या होत असल्याच्या सबबीखाली वगळण्यात आल्या, असे शासनाचे म्हणणे आहे.
 

अकोला जिल्ह्यातील वगळलेल्या योजना
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून आधी मंजुरी मिळाली. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली. त्यापैकी पाच योजना वगळण्यात आल्या. त्यामध्ये शिवर (६ गावे) निधी २३ कोटी १३ लाख ४२ हजार, वाशिंबा-३६.१५ लाख, कोळंबी-३९.३१ लाख, तपलाबाद- १ कोटी ९९ लाख, कानशिवणी- १ कोटी ९९ लाख ४७ हजार रुपयांच्या निधीसह योजनांचा समावेश आहे.


 अमरावती विभागातील वगळलेल्या योजना
अमरावती जिल्हा : भंडारज ता. अंजनगाव सुर्जी, आखतवाडी, सुकळी, बोराळा, कवठा कडू, ढोमणबर्डा
वाशिम : चांडस, मुंगळा, उंबर्डा बाजार, आसेगाव, शिवणी दलेलपूर, कळंबा.
बुलडाणा : रोकडिया नगर नळ पाणी पुरवठा योजना, जलंब.


 नव्यांपैकी २० योजना पश्चिम महाराष्ट्रात
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत मंजूर असलेल्या ११९ पैकी विदर्भातील ३७ योजना वगळण्यात आल्या. त्यामध्ये अमरावती विभागातील १९ तर नागपूर विभागातील १८ योजना आहेत. त्याचवेळी नव्याने मंजुरी दिलेल्या २५ योजनांमध्ये विदर्भातील एकाही योजनेचा समावेश नाही. त्यामध्ये मराठवाड्यातील केवळ पाच योजना आहेत. त्यामध्ये जालना-२, औरंगाबाद, परभणी, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एक योजना आहे, तर २० पाणी पुरवठा योजना पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली या दोनच जिल्ह्यातील आहेत.

Web Title: 19 schemes drops in Amravati division from Chief Minister drinking water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.