महापालिका शाळांमधील १९४८ विद्यार्थ्यांना मिळणार सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 03:44 PM2020-07-26T15:44:22+5:302020-07-26T15:44:38+5:30
या निर्णयामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या चेहºयावर हसू फुलणार आहे.
अकोला: महापालिकेच्या इयत्ता पाचवी, सहावी व सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या १ हजार ९४८ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनिषा रवींद्र भंसाली यांनी ८७ लाख ६६ हजार रुपयांची तरतूद केली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या चेहºयावर हसू फुलणार आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने मनपा शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शहरातील गरजू कुटुंबातील महिलांना विविध साहित्याचे वाटप केले जाते. महापालिकेत भाजपाची २0१४ पासून सत्ता असली तरीही या समितीमार्फत शाळेतील विद्यार्थी व शहरातील गरजु महिलांना मदतीसाठी तब्बल सहा वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून येते. २०२० मध्ये मनिषा भंसाली यांनी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विद्यार्थी व महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांसाठी निधीच्या तरतुदीसाठी प्रारंभ करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सभापती भंसाली यांनी मनपाच्या प्रत्येक शाळेमध्ये 'आरओ' प्लांट लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला आहे. शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी मनीषा भंसाली यांनी प्रशासनाकडे आर्थिक तरतुदीचा प्रस्ताव सादर केला होता. सदर साहित्य विद्यार्थिनींना नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता मनपा शाळेत इयत्ता पाचवी, सहावी तसेच सातवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध व्हावी, यासाठी तब्बल ८७ लक्ष ६६ हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला. या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे.
प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने महिला व बालकल्याण समितीने तयार केलेला प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. येत्या २८ जुलै रोजी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेमध्ये सदर प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.
अशी आहे वर्गनिहाय विद्यार्थी संख्या
इयत्ता पाचवी- ७५४
इयत्ता सहावी - ६११
इयत्ता सातवी - ५८३