बँक व्यवस्थापक असल्याचे सांगून २ लाख रुपयाने फसवणूक
By admin | Published: October 13, 2015 11:37 PM2015-10-13T23:37:05+5:302015-10-13T23:37:05+5:30
लोणार येथील घटना; गुन्हा दाखल.
लोणार (जि. बुलडाणा): येथील एका सेवानवृत्त शिक्षकाची स्टेट बँकेमध्ये व्यवस्थापक असल्याचे सांगून २ लाख रुपयाने फसवणूक झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील सेवानवृत्त शिक्षक सुरेशचंद्र गजाधर व्यास यांना ६ ऑक्टोबर रोजी एक फोन आला. त्यावर भारतीय स्टेट बँक मुंबई हेड ऑफिसमधून व्यवस्थापक राकेश शर्मा बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर बँक खाते संदर्भात विचारणा करून संबंधित खात्याच्या एटीएमबाबत माहिती मागितली. तेव्हा सुरेशचंद्र व्यास यांनी संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी सुरेशचंद्र व्यास यांनी बँक खाते तपासले असता जमा असलेली रक्कम त्यांना खात्यात आढळून आली नाही. तर जमा पैशाद्वारे वेगवेगळ्या कंपन्याकडे ऑनलाइन खरेदी केल्याचे त्यांना समजले. दरम्यान, बँक व्यवस्थापक असल्याचे सांगून खात्याची माहिती घेणार्या अज्ञात राकेश शर्माकडून फसवणूक झाल्याचे व्यास यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास ठाणेदार किशोर कांबळे हे करीत आहेत.