भूसंपादनासाठी २0 कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2017 02:41 AM2017-03-18T02:41:53+5:302017-03-18T02:41:53+5:30

अकोला जिल्हय़ात १५ सिंचन प्रकल्पांची कामे.

20 crore for land acquisition! | भूसंपादनासाठी २0 कोटी!

भूसंपादनासाठी २0 कोटी!

Next

अकोला, दि. १७- जिल्हय़ातील १५ सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी भूसंपादनापोटी शेतकर्‍यांना मोबदल्याची रक्कम देण्यासाठी गत फेब्रुवारी अखेरपर्यंत २0 कोटी १८ लाख ३९ हजार रुपयांचा निधी उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आला असला, तरी सिंचन प्रकल्पांची कामे मात्र अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे भूसंपादनात अडकलेली सिंचन प्रकल्पांची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हय़ातील अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर व पातूर या चार तालुक्यांत सन २00९-१0 ते २0१४-१५ या कालावधीत १५ सिंचन प्रकल्पांची कामे मंजूर करण्यात आली. त्यामध्ये बाळापूर तालुक्यातील कासारखेड, उरळ बु., अंत्री मलकापूर, कारंजा रमजानपूर, अंत्री मलकापूर, कारंजा रमजानपूर, मनारखेड व लोहारा. मूर्तिजापूर तालुक्यातील आलापूर (उजाड), रोहणा व पोही. अकोट तालुक्यातील शहापूर, दिवठाणा व पणज आणि पातूर तालुक्यातील जिरायत पातूर इत्यादी १५ सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. मंजूर सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया रखडल्याने, जिल्हय़ातील १५ सिंचन प्रकल्पांची कामे अद्यापही सुरू करण्यात आली नाही. आक्षेपांचा निपटारा, प्रकल्पांसाठी जमीन संपादनासाठी शेतकर्‍यांना मोबदला देण्यासाठी निधीच्या अभावात सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया रेंगाळली. १५ सिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला मंजूर करण्यात आला असून, मोबदल्याच्या रकमेपोटी शासनामार्फत निधी उपलब्ध झाल्यानंतर २0 कोटी १८ लाख ३९ हजार ५९ रुपयांचा निधी गत २ फेब्रुवारीपर्यंंत जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागामार्फत अकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयांना वितरित करण्यात आला. या निधीतून प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना जमीन मोबदल्याची रक्कम वितरित करण्यात येणार असून, मोबदल्याची रक्कम शेतकर्‍यांना वितरित करण्यात आल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिंचन विभागामार्फत सिंचन प्रकल्पांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने भूसंपादनात अडकलेली जिल्हय़ातील सिंचन प्रकल्पांची कामे केव्हा मार्गी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: 20 crore for land acquisition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.