अकोला जिल्ह्यातील २0 खासगी शाळा अनुदानास अपात्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 02:43 PM2019-03-15T14:43:43+5:302019-03-15T14:43:50+5:30
अकोला: नुकत्याच जाहीर झालेल्या खासगी प्राथमिक शाळांच्या पात्र-अपात्र यादीमध्ये जिल्ह्यातील केवळ तीन शाळा अनुदानास पात्र ठरल्या असून, इतर २0 शाळा मात्र अपात्र ठरल्या आहेत.
अकोला: नुकत्याच जाहीर झालेल्या खासगी प्राथमिक शाळांच्या पात्र-अपात्र यादीमध्ये जिल्ह्यातील केवळ तीन शाळा अनुदानास पात्र ठरल्या असून, इतर २0 शाळा मात्र अपात्र ठरल्या आहेत. या अपात्र खासगी प्राथमिक शाळांना शासनाने त्रुटींची पूर्तता करण्याची संधी द्यावी, अशी मागणी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने बुधवारी केली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार, प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले होते. या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांची तपासणी व पडताळणी करण्यात आली आणि जिल्हा मूल्यांकन समितीकडून शिफारससुद्धा मागविण्यात आली होती. अनुदान पात्रतेचे अभिप्राय मिळाल्यानंतर शासनाने जिल्ह्यातील केवळ तीन शाळा अनुदानासाठी पात्र ठरविल्या, तर उर्वरित २0 खासगी प्राथमिक शाळांच्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने या शाळांना अपात्र ठरवित अनुदान नाकारले; परंतु या शाळांना त्रुटींची पूर्तता करण्याची संधी शासनाने द्यावी, जेणेकरून या शाळांना अनुदान मिळेल आणि शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागेल. अशा आशयाचे निवेदन राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना बुधवारी दिले.
शाळा पात्र करून आणणारे दोन दलाल कार्यरत!
अपात्र ठरलेल्या शाळांना अनुदानासाठी पात्र करून देण्यासाठी जिल्ह्यात दोन दलाल कार्यरत असल्याची माहिती आहे. पैसे देऊन शाळा पात्र करून आणून देतो, अशा दोन दलालांपासून शिक्षण संस्था, शिक्षकांनी सावध राहावे, या व्यक्तींनी संचालक कार्यालयातून शाळा पात्र करून आणतो, अशा भूलथापा देऊन यापूर्वीच काही शिक्षकांची फसवणूक केली आहे. अकोट येथील एक शिक्षक व कौलखेड परिसरातील एका माध्यमिक शाळेच्या प्रयोगशाळा परिचराने शाळा अनुदानास पात्र करतो म्हणून प्रतिशिक्षक ५0 हजार रुपये घेतल्याची तक्रार खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेकडे प्राप्त झाली आहे.
अपात्र शाळांना त्रुटी पूर्ततेची संधी मिळावी, यासाठी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघटना प्रयत्नशील आहे. लवकरच कॅप लावून त्रुटी पूर्ततेची संधी उपलब्ध होऊ शकते. संचालक कार्यालयाने पारदर्शकपणे शाळांची तपासणी केली. त्यामुळे कोणीही संबंधितांशी आर्थिक व्यवहार करू नये, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे.
-मनीष गावंडे, राज्याध्यक्ष,
खासगी प्राथमिक शिक्षक संघ.