व-हाडात २0 हजार हेक्टरवर पीकांचे नुकसान !
By admin | Published: March 5, 2016 02:30 AM2016-03-05T02:30:18+5:302016-03-05T02:30:18+5:30
गारपीट,अवकाळी पावसाचा फटका.
अकोला : सलग तीन दिवस झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने वर्हाडातील पाच जिल्हयातील रब्बी पिकासंह भाजीपाला व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या भागातील २0 हजार ४0४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना झळ बसली आहे.
पावसाच्या अनिश्चिततेमुळे गत वर्षी खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम रब्बी पिकांच्या पेरणीवर झाला. जमिनीत ओलावा नसल्याने सोयाबीनच्या खाली क्षेत्रावर शेतकर्यांना रब्बी पिके घेता आली नाही. कोरडवाहू शेतकर्यांसह संरक्षित सिंचनाची सोय असलेल्या शेतकर्यांनीही गहू,हरबरा आदी पिकांची पेरणी केली; पंरतु तीन दिवस वादळी वार्यासह आलेल्या अवकाळी पावसाने मुख्यत्वे गहू,हरबरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा आंबा मोहोर झडला आहे. भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा पिकावर सर्वाधिक परिणाम झाला असून, इतरही सर्वच भाजीपाला पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. सध्या अनेक भागात शेतकर्यांनी हरबरा काढणीला सुरू वात केली आहे. अनेक शेतात गंजी लावलेल्या दिसत आहे; पंरतु अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांची तारांबळ उडाली असून, गंजी झाकण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरू आहे.
दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेने प्रत्येक भागात जावून पिकांची पाहणी केली. या पाहणीत रब्बी पिकांसह फळ, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार यवतमाळ जिल्हयातील ८ हजार १९५ हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्हयात १ हजार ८५0 हेक्टरच्यावर,वाशिम १,१२0 हेक्टरवर, अकोला २११ हेक्टर तर अमरावती जिल्हयातील ९ हजार २८ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके, फळे,भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.