२० हजार क्विंटल तुरीवर व्यापाऱ्यांचा डोळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2017 01:44 AM2017-04-24T01:44:10+5:302017-04-24T01:44:10+5:30
नाफेडची तूर खरेदी बंद: हजारावर शेतकरी तूर विक्रीपासून वंचित
अकोला : शासनाने रविवारपासून नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्रामार्फत तूर खरेदी बंद केल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २० हजार क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत होती; परंतु या तुरीवर आता व्यापाऱ्यांचा डोळा आहे. मनमानी भावाने शेतकऱ्यांकडील तूर खरेदी करण्यास व्यापारी उत्सुक असल्याचे येथील चित्र आहे.
गत दोन महिन्यांपासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील पाच केंद्रांवर शासकीय खरेदी केंद्रांवर हमीभावाने तूर खरेदी करण्यात येत होती; परंतु यातही शेकडो व्यापाऱ्यांनी घुसखोरी करून आपली तूर विकली. खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत नाफेडच्या खरेदी केंद्रांवर तुरीला ५०५० रुपये भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांचा अधिक कल नाफेडकडे होता; परंतु नाफेडचे अधिकारी तूर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी कशी कमी होईल, त्यांची कमी प्रमाणात तूर कशी येईल, यासाठी शेतकऱ्यांना त्रास देत होते. सुरुवातीला काही रात्री उशिरापर्यंत तुरीचे माप व्हायचे; परंतु पुढे नाफेडने ५ वाजेपर्यंतच तुरीचे माप करण्याची भूमिका स्वीकारली. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना टोकन दिले जात होते; परंतु नाफेडकडून दररोज २० ते २५ शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जात होती. शेतकऱ्यांना वेठीस धरण्यासाठी नाफेडचे अधिकारी सातत्याने प्रयत्न करीत होते. एवढेच नाही, तर अधिकाऱ्यांकडून नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणूच नये, असेही प्रयत्न केल्या जात होते. रविवारपासून नाफेडने तूर खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समिती आवारात ट्रॅक्टरात पडून असलेली तूर आता कोठे विकावी, खासगी व्यापाऱ्याला तूर विकायचे म्हटले तर व्यापारी मातीमोल भावाने तुरीची खरेदी करेल. नाफेडची तूर खरेदी बंद झाल्याने आता व्यापारी शेतकऱ्यांच्या तुरीवर डोळा ठेवून आहेत. दरम्यान याबाबत नाफेडच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
शेतकऱ्यांची हाती धुपाटणे...
शेकडो शेतकऱ्यांची तूर ट्रॅक्टर, मालवाहू वाहनामध्ये बाजार समितीच्या आवारात पडून आहेत. आज ना उद्या तुरीचे माप होईल, अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. त्यामुळे शेतकरी पाचशे रुपये रोजाप्रमाणे भाड्याने ट्रॅक्टर व मालवाहू वाहनामध्ये तूर विक्रीसाठी घेऊन आले; परंतु आता अचानक नाफेडने तूर खरेदी बंद केल्याने, शेतकऱ्यांना वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड सहन करावा ला गेल आणि व्यापारी मागेल त्या भावाने तूर विकावी लागेल.