२०० खाटांचे जम्बो कोविड हेल्थ सेंटर सज्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:13 AM2021-05-03T04:13:38+5:302021-05-03T04:13:38+5:30
अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत ...
अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात २०० खाटांचे जम्बो डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सज्ज करण्यात आले असून, आज, सोमवारपासून हे सेंटर कार्यान्वित होणार आहे. त्यानुषंगाने पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शनिवारी या कोविड हेल्थ सेंटरला भेट देऊन पाहणी केली.
जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पूरक व्यवस्था करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दीक्षांत सभागृहात २०० खाटांचे नियोजन असलेले डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर ऑक्सिजन सुविधेसह सुरू करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत येथे १०० खाटांची सुविधा करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सोमवारपासून हे सेंटर सुरू होणार आहे. त्यानुषंगाने पालकमंत्री बच्चू कडू यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त नीमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, सदाशिव शेलार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन सभागृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचीही पाहणी केली.
.......................................फोटो......................