अकोल्यात सुरू होणार २०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:17 AM2021-05-01T04:17:03+5:302021-05-01T04:17:03+5:30
अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता कहर लक्षात घेता, कोरोनाबाधित रुग्णांसाठी अकोल्यात २०० खाटांचे जम्बो डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू ...
अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता कहर लक्षात घेता, कोरोनाबाधित रुग्णांसाठी अकोल्यात २०० खाटांचे जम्बो डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराकरिता अकोल्यातील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील वसतिगृहाच्या इमारतींमध्ये २०० खाटांचे जम्बो डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार, लवकरच जम्बो कोविड रुग्णालय सुरू होणार असून, या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसह ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून
१.४५ कोटींचा निधी मंजूर!
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी २०० खाटांचे जम्बो डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णालयात आवश्यक असलेल्या सुविधांचा खर्च भागविण्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याचा आदेशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी अकोल्यात २०० खाटांचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्यात येत असून, त्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जितेंद्र पापळकर
जिल्हाधिकारी