२०० मिली प्लाझ्मा युनिटचे दर ५५०० रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:26 AM2020-09-27T11:26:13+5:302020-09-27T11:26:21+5:30
सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतही नव्या मान्यतेनुसार दर आकारणी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे.
अकोला : करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या प्लाझ्माच्या २०० मिलीच्या एका बॅगसाठी साडेपाच हजार रुपयांचा दर आकारण्यात येणार आहे. खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या तसेच रुग्णालयांना राज्याच्या आरोग्य विभागाने या दर आकारणीसंदर्भात मान्यता दिली आहे. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतही नव्या मान्यतेनुसार दर आकारणी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे.
राज्यात विविध ठिकाणी खासगी व विश्वस्त रक्तपेढ्यांकडून प्लाझ्मा थेरेपीसाठी आवश्यक प्लाझ्मा बॅगसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर रुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध व्हावा, प्लाझ्माची प्रती डोस किंमत निश्चित व्हावी यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. समितीने ही दर निश्चिती केलेली आहे. त्यानुसार प्लाझ्मा बॅगसाठी ५,५०० रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आता अतिरिक्त दर कुणी आकारत असल्यास रकमेची परतेड करणे बंधनकारक आहे, अन्यथा कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
सात हजारांपर्यंत होते दर
वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात विविध ठिकाणी प्लाझ्माचे वेगवेगळे दर आकारण्यात आले आहेत. सुमारे ४ ते ७ हजार रुपयांपर्यंत प्रतिबॅग प्लाझ्मा देण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी ७ हजार रुपये प्रतियुनिट या दराने प्लाझ्मा देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
चाचण्यांचे दर वेगळे
दरम्यान, नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करून दिल्यास प्लाझ्मा बॅगेच्या किमतीशिवाय या चाचणीसाठी कमाल दर १,२०० रुपये प्रती चाचणी आकारण्यात येणार आहेत. तसेच केमिल्युमिनेसन्स तपासणी करून प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रती चाचणी कमाल दर ५०० रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
जीएमसीत २३ जणांनी केले प्लाझ्मा दान
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत २३ डोनरकडून प्लाझ्मा संकलित करण्यात आला आहे. २०० मिली प्रमाणे ४५ युनिटचे आतापर्यंत संकलन झाल्याची सूत्रांची माहिती आहे.