२00 क्विंटल धान्य गायब!
By admin | Published: July 16, 2017 02:39 AM2017-07-16T02:39:13+5:302017-07-16T02:39:13+5:30
अकोटच्या गोदामातील प्रकार : तपासणीत उघड झाला अपहार.
सदानंद सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गरिबांना शिधापत्रिकांवर पुरवठय़ासाठी गोदामात साठा केलेल्या गहू आणि तांदळापैकी २00 क्विंटल धान्य गायब झाल्याचे समोर आले आहे. या धान्याची काळ्य़ा बाजारात विक्री करून अपहार झाल्याचा संशय आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने अकोटचे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी शनिवारी अचानक केलेल्या तपासणीत हा घोळ उघड झाला आहे. त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर केल्याची माहिती आहे.
शिधापत्रिकाधारकांना वाटप करावयाच्या धान्याचा अकोट, तेल्हारा तालुक्यातून सातत्याने अपहार होत असल्याच्या घटना यापूर्वीही उघड झाल्या आहेत. त्यामुळे या गोदामाकडे सातत्याने लक्ष देणे आवश्यक आहे. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी तातडीने गोदामाची चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी दिले.
त्यानुसार शनिवारी दिवसभर गोदामातील धान्याचा ताळमेळ घेण्यात आला. तसेच पोत्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले. त्यामध्ये गोदामातील उपलब्ध साठय़ापैकी १४३ क्विंटल गहू आणि ४0 क्विंटलपेक्षाही अधिक तांदूळ कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासणीचा अहवाल शनिवारी सायंकाळीच जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता गोदामपाल मंगेश मेश्राम यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
गोदामातून तीन वर्षात तिसर्यांदा अपहार
अकोटच्या गोदामातून सर्रासपणे धान्याचा अपहार होण्याच्या घटना घडतात. यापूर्वीही त्या उघडकीस आल्या आहेत. त्यामध्ये गोदामपाल थिटे यांच्या काळात ३00 ते ४00 क्विंटल, त्यानंतरचे योगेश जांभूरकर यांच्या काळात २00 क्विंटलपेक्षाही अधिक धान्याचा साठा गोदामात कमी आढळला होता. त्यांच्यावर निलंबनासह अपहारित धान्याची रक्कम वसुलीची कारवाई झाली आहे. आता गोदामपाल मंगेश मेश्राम यांच्या काळातील धान्यसाठय़ाची चौकशी झाली आहे. त्यामध्ये गहू आणि तांदुळाची मिळून ४ लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या धान्याचा अपहार झाल्याचे स्पष्ट होत आहे.
अकोट-तेल्हार्यात रेशन माफियांचे राज्य
विशेष म्हणजे, तेल्हारा तालुक्यातून तर २00 क्विंटल तांदळाचा ट्रक दरमहा नागपूरच्या खुल्या बाजारात विकण्याचा धंदाच या दोन्ही तालुक्यातील माफियांनी सुरू केला होता. तसा प्रकार उघड झाल्यानंतरही तेल्हारा येथील तत्कालीन गोदामपालावर कुठलीच कारवाई प्रशासनाने केली नव्हती. केवळ त्याची बदली अकोट येथे करून पुरवठा विभाग समाधानी झाला होता. त्यानंतरही या तालुक्यातच तांदुळाची वाहतूक करणार्या वाहनाविरोधात निरीक्षण अधिकार्यांनीच फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये असलेला आरोपी शालेय पोषण आहाराचा अकोट तालुका उपकंत्राटदाराचा भाऊ आहे, हे विशेष. यावरून या तालुक्यांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांचा अंदाज येतो.
गोदामातील धान्याचा ताळमेळ शनिवारी दिवसभर घेतला आहे. पोत्यांचे प्रमाणीकरण सुरू आहे. नियमित तपासणी असून, त्याबाबतचा अहवाल उद्यापर्यंत जिल्हाधिकार्यांकडे सादर केला जाईल.
- विश्वनाथ घुगे,
तहसीलदार अकोट.