अकोला जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या खात्यात २०.८२ कोटी जमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:41 AM2020-08-18T10:41:39+5:302020-08-18T10:42:03+5:30
उपलब्ध निधीच्या ८० टक्के २० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करण्यात आला.
अकोला : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत शासनामार्फत उपलब्ध २६ कोटी २ लाख ७ हजार रुपयांच्या निधीचे वितरण सोमवारी जिल्हा परिषदमार्फत करण्यात आले. त्यामध्ये उपलब्ध निधीच्या ८० टक्के २० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करण्यात आला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध विकास कामांसाठी पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत २६ कोटी २ लाख ७ हजार रुपयांचा निधी शासनामार्फत गत महिन्यात जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. नियमानुसार उपलब्ध निधीतून ८० टक्के निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना, १० टक्के निधी जिल्ह्यातील पंचायत समित्यांना आणि १० टक्के निधी जिल्हा परिषदेला वितरित करणे आवश्यक आहे. त्यानुसार पंधराव्या वित्त आयोगांतर्गत उपलब्ध निधीचे वितरण १७ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले. त्यामध्ये उपलब्ध निधीच्या ८० टक्के म्हणजेच २० कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करण्यात आला. उर्वरित १० टक्के २ कोटी ६० लाख २६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांना आणि १० टक्के २ कोटी ६० लाख २६ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आला. ग्रामपंचायतींचे क्षेत्रफळ व लोकसंख्येचे प्रमाण विचारात घेऊन जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विकासमांसाठी पंधराव्या वित्त आयोगांतर्गत निधीचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या आदेशानुसार निधीचे वितरण करण्यात आले आहे.