२१ लाख जप्त: प्रकरण आयकर विभागाकडे!
By admin | Published: January 20, 2017 02:40 AM2017-01-20T02:40:07+5:302017-01-20T02:40:07+5:30
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी रात्री दोघा व्यापा-यांकडून २१ लाख ४५ हजार रुपयांची रोकड जप्त केली होती.
अकोला, दि. १९- स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी रात्री दोघा व्यापार्यांकडून २१ लाख ४५ हजार रुपयांची रोकड जप्त केली होती. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आयकर विभागाला पत्र दिले आहे. त्यामुळे २१ लाख रुपयांच्या रकमेची चौकशी आयकर विभागाचे अधिकारी करणार आहेत.
सिंधी कॅम्पमधील हिरालाल वाधवानी आणि गिरीधर अग्रवाल हे लाखो रुपयांची रोकड घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान दोघांकडे २१ लाख ४५ हजार रुपयांची रोकड मिळाली. ही रक्कम हवालातील असल्याचा संशय पोलिसांना आहे. या दोघांनी दिलेल्या उत्तरांमुळे पोलिसांचे समाधान झाले नाही. त्यामुळे रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आले; परंतु त्यांच्याकडील रोकड कोतवाली पोलिसांच्या हवाली देण्यात आली. तसेच पोलिसांनी आयकर विभागालासुद्धा पत्र देऊन वाधवानी व अग्रवाल यांच्याकडे एवढी मोठी कुठून आली. याची चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आयकर विभाग २१ लाखांच्या रकमेची चौकशी करणार आहे.