विदर्भात महावितरणच्या २१ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 01:18 PM2021-04-20T13:18:44+5:302021-04-20T13:21:38+5:30
21 MSEDCL employees killed in Vidarbha : आतापर्यंत १ हजार ३१७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला : कोरोना काळात सेवा देताना विदर्भात १८ एप्रिलपर्यंत महावितरणच्या २१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत १ हजार ३१७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.
महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागातील १२ कर्मचारी संघटनांच्या सुमारे ४५ पदाधिकाऱ्यांशी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच लेखाजोखा मांडला. मार्च २०२० ते एप्रिल २०२१ पर्यंत नागपूर प्रादेशिक विभागात १ हजार ३१७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी ६५९ कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीत ६३७ कर्मचारी रुग्णालय व घरी उपचार घेत आहेत तर २१ सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही सर्व वयोगटांसाठी मोठी धोकादायक आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी तसेच ग्राहकसेवेचे कर्तव्य बजावताना आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यावे, असे रंगारी यांनी सांगितले.
२५ टक्के कर्मचाऱ्यांनी घेतली लस
नागपूर प्रादेशिक विभागातील नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २५ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. येत्या १५ दिवसांत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी कार्यालयप्रमुख व मानव संसाधन अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिले.
परिमंडलनिहाय अशी आहे आकडेवारी
परिमंडळ -- पॉझिटिव्ह -- मृत्यू
अकोला -- १५३ -- ०२
अमरावती -- २२८ -- ०३
चंद्रपूर -- ११० -- ०३
गोंदिया -- ११६ -- ०२
नागपूर -- ६६० -- ११