जय किसान! विदर्भातील २२ शेतकरी बंधू-भगिनींचा कृषीदिनी अकोला येथे गौरव, सन्मान!
By रवी दामोदर | Published: July 1, 2024 07:24 PM2024-07-01T19:24:47+5:302024-07-01T19:30:11+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी दिन उत्साहात साजरा
रवी दामोदर,अकोला: हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे कृषी दिनाचे आयोजन १ जुलै रोजी केले होते. विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे आयोजित या कार्यक्रमात राज्य शासनाद्वारे २०२२ या वर्षात पुरस्कृत केलेले कृषिभूषण पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार प्राप्त विदर्भातील एकूण २२ शेतकरी बंधू-भगिनींना सन्मानित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख, विशेष अतिथी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विठ्ठल सरप, हेमलता अंधारे यांच्यासह विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, नियंत्रक प्रमोद पाटील, कुलसचिव सुधीर राठोड, आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. संजीवकुमार सलामे यांनी केले. आभार प्रदर्शन विस्तार कृषी विद्यावेत्ता प्रा. प्रकाश घाटोळ यांनी केले.
आदर्श गाव निर्मितीसाठी विद्यापीठाचे प्रयत्न अधोरेखित!
फायदेशीर शेती तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष अवलोकन करीत त्या प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी शेतकरी बांधवांनी विद्यापीठाला भेट देण्याचे आवाहन करताना कुलगुरू डॉ. गडाख यांनी विभागनिहाय आपल्या समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठांमध्ये नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच आदर्श गाव निर्मितीसाठी विद्यापीठाचे प्रयत्न अधोरेखित केले.