निवडणूक कामाची धुरा २२00 शिक्षकांच्या खांद्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 02:38 PM2019-03-16T14:38:05+5:302019-03-16T14:38:16+5:30
अकोला: लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक विभागाने माध्यमिक शिक्षण विभागाकडे शिक्षकांची मागणी केली होती.
अकोला: लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक विभागाने माध्यमिक शिक्षण विभागाकडे शिक्षकांची मागणी केली होती. त्यानुसार शाळा स्तरावर शिक्षकांची आॅनलाइन माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये २२00 शिक्षकांकडे निवडणूक कामाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे निवडणूक विभाग तात्पुरत्या स्वरूपात विविध विभागांमधील अधिकारी, कर्मचारी आयात करतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक विभागाने शासकीय कार्यालयांना पत्र पाठवून अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची माहिती आॅनलाइन बोलाविली होती. त्यानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी शिक्षकांची आॅनलाइन माहिती निवडणूक विभागाकडे सादर केली. जवळपास माध्यमिकचे २२00 शिक्षकांच्या खांद्यावर निवडणुकीची धुरा सोपविण्यात आली आहे. अतिरिक्त शिक्षकांना तर यापूर्वीच निवडणूक विभागात काम देण्यात आले आहे.
दहावी, बारावी शिक्षकांची सुटका!
दहावी व बारावी परीक्षेसाठी नियामक आणि परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची निवडणूक कामामधून सुटका करण्यात आली आहे. शिक्षक संघटनांनी केलेल्या मागणीनुसार दहावी व बारावीच्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.