पाणीपुरवठा विभागाची २३ कोटींची थकबाकी
By admin | Published: March 3, 2017 01:51 AM2017-03-03T01:51:04+5:302017-03-03T01:51:04+5:30
मजिप्राची वसुली मोहीम : अकोटमध्ये दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा
अकोट, दि.२ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची अकोट शहरातील ग्राहकांकडे तब्बल २३ कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. अशा स्थितीत एकीकडे पाणीपुरवठा सुरू असताना दुसरीकडे मजिप्राने वसुली मोहीम सुरू केली आहे. या वसुली मोहिमेदरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्या दोघांविरुद्ध २ मार्च रोजी अकोट शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अकोट शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत घरगुती, व्यावसायिक व इतर ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात मजिप्राची ८ हजार अधिकृत जोडण्या आहेत. त्यामध्ये अंदाजे १,३०० जोडण्या बंद आहेत. या ग्राहकांना दरमहा देयके देण्यात आल्यानंतरही गत अनेक वर्षांपासून ग्राहकांनी देयकाची रक्कम जमा केली नाही. त्यामुळे ही थकबाकी २३ कोटींच्या घरात पोहचली आहे. यामध्ये नगर परिषद च्या स्टँडपोस्ट देयकांचासुद्धा समावेश आहे. या ग्राहकांकडे वारंवार देयकांची मागणी करूनही वसुली होत नसल्याने मजिप्राने शहरात कनेक्शन कटसह वसुलीची मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेदरम्यान काजीपुरा या ठिकाणी पाणीपट्टीच्या थकबाकी वसुली करण्याच्या कामी सरकारी काम करत असताना अ. सादिक अ. खालीक, अ. मुजाहिद अ. सादिक या दोघांनी मुजोरी करून वाद घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबतची तक्रार शाखा अभियंता वसीम अहेमद मो. सुलेमान यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला दिली असता अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात अधिकृत कनेक्शनसोबत मोठ्या प्रमाणात अवैध कनेक्शन वाढीस लागली आहेत.
त्यामुळे पाणीपुरवठा अपुरा होत असून मजिप्रालासुद्धा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशा अवैध नळ जोडण्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरसुद्धा फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
नळधारकांनी पाणीपट्टीची थकबाकी भरून मजिप्राला सहकार्य करून कारवाई टाळावी. तसेच अवैधरित्या कनेक्शन आढळल्यास अवैध जोडण्या करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- हरिदास ताठे
उपअभियंता, मजिप्रा, अकोट