१० महिन्यांत २३ सापळे, ३६ लाचखोर गजाआड ; अकोला 'एसीबी'ची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 03:18 PM2018-04-16T15:18:47+5:302018-04-16T15:18:47+5:30
अकोला - अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी गत १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याभरात रेकॉर्ड ब्रेक कारवाया केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
- सचिन राऊत
अकोला - अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी गत १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याभरात रेकॉर्ड ब्रेक कारवाया केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. केवळ १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात व बुलडाणा जिल्ह्यात अकोला एसीबीने २३ सापळे रचले असून, या २३ ठिकाणावरून तब्बल ३६ लाचखोरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बीडीओ, ठाणेदारांसह वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लाचखोरीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. जिल्ह्यात अॅन्टी करप्शनने केलेल्या कारवायांमध्ये पोलीस एक नंबरवर आहेत. तर महसूलचे कर्मचारी दोन नंबरवर आहेत. मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात बलात्कारातील आरोपीला अटक केली. मात्र, आरोपीला घरचे जेवण, पोलीस कोठडीत चांगल्या सोयी-सुविधा देण्याच्या बदल्यात पीएसआयने १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर अकोट उप विभागात १५ हजार रुपयांची लाच घेताना कॉन्स्टेबल व उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यास अटक करण्यात आली. महावितरणच्या दोन कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यावरही सापळा यशस्वी झाला.
१० महिन्यांतील कारवायांवर नजर
१. पोलीस विभाग - ६ सापळे - ११ पोलिसांना अटक
२.महसूल विभाग - ५ सापळे - १० कर्मचारी अटकेत
३. शिक्षण विभाग -३ सापळे -४ कर्मचारी अटकेत
४. महापालिका- २ सापळे -३ कर्मचारी अटकेत
५. कृषी विभाग - १ सापळे - ३ कर्मचारी अटकेत
६. महावितरण - २ सापळे -२ अधिकारी अटकेत
क्लास वन पदावरील सहा अटकेत
अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर १० महिन्यांचा कालावधी झालेला आहे. या कालावधीत २३ यशस्वी सापळे रचण्यात आले असून, यामध्ये सहा अधिकारी हे क्लासवन आहेत. एसीबीने ३६ लाचखोरांच्या मुसक्या आवळल्यानंतर या लाचखोरांमध्ये वर्ग १ चे सहा अधिकारी, वर्ग २ चे पाच अधिकारी व वर्ग ३ चे २३ लाचखोरांना अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्याबाहेर कारवाईत ठाणेदार अटकेत
अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे कारवाई करून बाहेर जिल्ह्याचाही विश्वास संपादन केला आहे. मलकापूर पोलीस ठाण्यातील ठाणेदारासह पीएसआय व कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर अकोला पंचायत समितीच्या लाचखोर बीडीओसह सरपंच पुत्रापर्यंतच्या साखळीतील पाच जणांना अटक केल्याची उल्लेखनीय कारवाई करण्यात आलेली आहे.