आज २३८ लाभार्थींना मिळणार कोविड लसीचा दुसरा डोस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:17 AM2021-02-15T04:17:32+5:302021-02-15T04:17:32+5:30
कोविड लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना लसीमुळे रिॲक्शन दिसून आले, परंतु त्याचा वाईट परिणाम झाला नाही. त्यामुळे लसीविषयी असलेली भीती ...
कोविड लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना लसीमुळे रिॲक्शन दिसून आले, परंतु त्याचा वाईट परिणाम झाला नाही. त्यामुळे लसीविषयी असलेली भीती अनेकांच्या मनातून गेली. लस घेऊन २८ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने लाभार्थीं लसीच्या दुसऱ्या डोसची आतुरतेने प्रतीक्षा करू लागले. त्यांची ही प्रतीक्षा संपली असून, त्यांना सोमवार १५ फेब्रुवारीपासून लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. या मोहिमेसोबतच उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचाऱ्यांसह इतर फ्रंट लाइन कोविड योद्ध्यांना कोरोना लसीचा पहिला डोसदेखील दिला जाणार आहे. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील ८ हजार ९५५ लाभार्थींना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
जिल्ह्यात ११ केंद्रावर लसीकरण
ग्रामीण भाग - ६ केंद्र
महापालिका क्षेत्र - ५ केंद्र
आठवडाभरात ८४८ लाभार्थींना दुसरा डोस
कोविड लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यास सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील ८४८ लाभार्थींना लसीचा दुसरा डोस देणे अपेक्षित आहे.
आणखी मिळणार दहा हजार डोस
जिल्ह्यात आतापर्यंत दोन टप्प्यात १८ हजार कोविड लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. लसीकरणाची प्रक्रिया सुरूच असून, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्करसाठी आणखी १० हजार ९०० डोस मिळणार आहे. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यासाठी हे डोस उपलब्ध होणार आहेत.
सोमवारपासून जिल्ह्यात कोविड लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने पहिल्या दिवशी २३८ लाभार्थींना दुसरा डोस दिला जाणार आहे. यासोबतच मिक्स सेशनअंतर्गत आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाइन वर्कर यांनादेखील लसीचा डोस दिला जाणार आहे.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला