शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी हवे २४ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 11:19 AM2020-11-24T11:19:31+5:302020-11-24T11:19:36+5:30
आणखी २४ कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
अकोला: जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेला २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आला असून, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी २४ कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने शासनाकडून मदतनिधी प्राप्त होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ६८ हजार ५७१ शेतकऱ्यांचे ५१ हजार ६६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी ५१ कोटी रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांचा निधी १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतनिधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला. तहसील कार्यालयांकडून शेतकऱ्यांच्या याद्या आणि मदतीची रक्कम बॅंकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, २१ नोव्हेंबरपर्यंत ३३ हजार ४३८ शेतकऱ्यांच्या याद्यांसह २४ कोटी ५ लाख ७९ हजार रुपये मदतीची रक्कम बॅंकांमध्ये जमा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात शासनाकडून प्राप्त मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी आणखी २४ कोटी ६३ लाख रुपयांच्या मदत निधीची आवश्यक असून, शासनाकडून मदतनिधी केव्हा प्राप्त होणार, यासंदर्भात प्रतीक्षा केली जात आहे.