अकोला जिल्ह्यातील २४ डी.एड. काॅलेजेस बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 11:28 AM2020-12-19T11:28:52+5:302020-12-25T16:24:51+5:30

D.Ed. Colleges News शासनाने शिक्षक भरती बंद केल्यामुळे शासकीय व खासगी अध्यापक महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली.

24 D.Ed. in Akola district Colleges closed! | अकोला जिल्ह्यातील २४ डी.एड. काॅलेजेस बंद!

अकोला जिल्ह्यातील २४ डी.एड. काॅलेजेस बंद!

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी पाठ फिरविली. डी.एड. कॉलेजेस ओस पडू लागली. शिक्षक होण्याचे स्वप्न आता केवळ स्वप्नच राहिले आहे.

अकोला : एकेकाळी डी.एड. कॉलेजेसमध्ये शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा मोठा ओढा होता. शाळांमध्ये रिक्त पदे भरली जायची. त्यामुळे विद्यार्थी डी.एड. कॉलेजेसमध्ये प्रवेश घेऊन शिक्षक होण्याचे स्वप्न पाहायचे. परंतु २००९ पासून शासनाने शिक्षक भरती बंद केल्यामुळे शासकीय व खासगी अध्यापक महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली. डी.एड. कॉलेजेस ओस पडू लागली. विद्यार्थ्यांचा आता डी.एड.कडे कलच नसल्याने, अकोला जिल्ह्यातील २६ पैकी २४ डी.एड. कॉलेजेस बंद पडली आहेत. केवळ दोन कॉलेजेस सुरू आहेत. शिक्षक होण्याचे स्वप्न आता केवळ स्वप्नच राहिले आहे. शिक्षक म्हणून काम करण्याची इच्छा असणारे तरुण-तरुणी शासकीय अध्यापक महाविद्यालयांसोबतच खासगी अध्यापक महाविद्यालयांकडे प्रवेशासाठी रांग लावायचे. डोनेशन भरून प्रवेश घ्यायचे. गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा. परंतु, शासनाने शिक्षक भरती बंद केल्यावर विद्यार्थ्यांचा कल बदलला. शिक्षक म्हणून नोकरी लागत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी अनेक वर्षांपासून डी.एड. कॉलेजेसकडे कायमची पाठ फिरविल्याचे चित्र दरवर्षी दिसून येते. अकोला जिल्ह्यात डी.एड.ची खासगी व शासकीय अशी मिळून २६ कॉलेजेस होती. परंतु, शिक्षक भरतीच होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे डी.एड. कॉलेजेसमधील विद्यार्थीसंख्या घटली. आता डी.एड. कॉलेजेसमध्ये प्रवेश होत नसल्यामुळे ही कॉलेजेस ओस पडली आहेत. शासकीय अध्यापक महाविद्यालयांमधील अधिव्याख्यात्यांना शैक्षणिक गुणवत्तेचे कार्य सोपविले आहे.

 

शासनाने शिक्षक भरती बंद केल्यानंतर खासगी, शासकीय अध्यापक महाविद्यालये बंद पडली. विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी येतच नाहीत. शिक्षक भरती सुरू केल्यानंतर अध्यापक महाविद्यालयांना गतवैभव प्राप्त होऊ शकते.

-डॉ. समाधान डुकरे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला

 

शिक्षक होण्याची इच्छा आहे. परंतु, आता डी.एड. करून उपयोग नाही. शिक्षक म्हणून नोकरी लागत नसल्यामुळे डी.एड.ला आता कोणी प्रवेश घेत नाही. डी.एड. केल्यानंतरही खासगी शाळांमध्ये अल्पशा मानधनावर नोकरी करावी लागते.

-आरती भेलोंडे, बेरोजगार तरुणी

Web Title: 24 D.Ed. in Akola district Colleges closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.