२४ हजार ७0१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा!
By admin | Published: February 17, 2016 02:22 AM2016-02-17T02:22:35+5:302016-02-17T02:22:35+5:30
कॉपीबहाद्दरांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सहा भरारी पथके.
अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात २४ हजार ७0१ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षेदरम्यान कॉपीबहाद्दरांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने सहा भरारी पथके नियुक्त केली आहेत. सोबतच चित्रिकरणसुद्धा पथक करणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. परीक्षेचे संपूर्ण नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. बारावीच्या परीक्षेसाठी ७१ परीक्षा केंद्रे राहणार असून, या परीक्षा केंद्रांवर २४ हजार ७0१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान होणार्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रे नेमली आहेत तसेच परीक्षा उपकेंद्रेही देण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान कॉपीबहाद्दारांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या भरारी पथकापुढे राहणार आहे. शिक्षण विभागाने परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिसंवेदनशील, संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी तयार केली असून, या केंद्रांवर अधिक लक्ष देण्यात येणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. १८ फेब्रुवारी रोजी इंग्रजी व २६ फेब्रुवारी रोजी गणित विषयाच्या पेपरवर कडक निगराणी करण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय पालक व इतरांना शाळा परिसरात फिरण्यास बंदी घालण्यात येणार आहे.