अकोला जिल्ह्यातील २४ गावे होणार 'हर घर जल' घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 08:09 PM2022-07-30T20:09:00+5:302022-07-30T20:09:05+5:30
Akola News : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत 'हर घर नल से जल' उत्सव मोहीम राबविण्यात येत आहे.
अकोला : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत 'हर घर नल से जल' उत्सव मोहीम राबविण्यात येत आहे. शंभर टक्के वैयक्तिक व संस्थात्मक नळजोडणी पूर्ण करणारी २४ गावे 'हर घर जल' घोषित करण्यात येणार आहे. विशेष मोहिमेमध्ये १२ ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. या मोहिमेदरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत १०० टक्के नळजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण झालेल्या गावाची हर घर जल घोषित करून नळजोडणी पूर्ण झाल्याचे गावाचे प्रमाणपत्र, विशेष सभेचे छायाचित्रिकरण, ग्रामस्थांची मुलाखतीचा २-३ मिनिटांची मुलाखत व फोटो केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावयाची आहे.
विशेष ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत हर घर जल घोषित करण्याबाबत ठराव घेणे, त्यानंतर गावात समारंभ घेऊन हर घर जल उत्सव साजरा करणे, विद्यार्थ्यांची रॅली काढणे, जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन करणे, लोककलांचा वापर करून जनजागृती करणे आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी एफटीके (FIELD TEST KIT) च्या माध्यमातून विशेष मोहीम राबविणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
हर घर जल उत्सवामध्ये गावातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळा ,अंगणवाडी ,आरोग्य केंद्र या मधील सर्व घटकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे, तर ग्रामपंचायत शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, व ईतर शासकिय सार्वजनिक ठिकाणी नळजोडणी या दरम्यान देण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष तसेच तालुका स्तरावर गट विकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजीव फडके, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग संजय कावळे यांनी केले आहे.