२४ गावे हस्तांतरणाचा ‘अँक्शन प्लॅन’!
By admin | Published: September 1, 2016 02:46 AM2016-09-01T02:46:46+5:302016-09-01T02:46:46+5:30
मनपा आयुक्त-जिल्हा परिषद ‘सीईओं’ची बैठक; २४ गावे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु.
अकोला, दि. ३१: महानगरपालिका हद्दवाढीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २४ गावांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया मनपा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली. त्यासाठी मनपा आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या (सीईओ) बैठकीत बुधवारी कृती आराखडा (अँक्शन प्लॅन)तयार करण्यात आला. मनपा हद्दवाढीत शिलोडा, नायगाव, वाकापूर, तपलाबाद, निजामपूर, अकोला ग्रामीण सुकापूर, अक्कलकोट, शहानवाजपूर, डाबकी, खडकी बु., अकोली खुर्द, अकोली बु., हिंगणा, सोमठाणा, शिवापूर, मलकापूर, शिवणी, शिवर, खरप बु., उमरी प्र.अकोला, उमरखेड, उमरी प्र.बाळापूर व गुडधी इत्यादी २४ गावे समाविष्ट करण्यात आली. मनपा हद्दवाढीची अधिसूचना मंगळवारी जाहीर झाल्यानंतर बुधवारी हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आलेली गावे मनपा क्षेत्रात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. २४ गावे जिल्हा परिषदकडून मनपाकडे हस्तांतरित करण्याच्या मुद्दय़ावर बुधवारी जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त एस.सी.सोळंके व संबंधित अधिकार्यांच्या बैठकीत हद्दवाढीमध्ये समाविष्ट २४ गावांच्या हस्तांतरणाचा कृती आराखडा (अँक्शन प्लॅन ) तयार करण्यात आला. त्यामध्ये मनपा हद्दवाढीत समाविष्ट २४ गावांमधील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद इमारती, सुरू असलेली इमारतींची बांधकामे, ग्रामपंचायत कर्मचार्यांचे समायोजन, कर वसुली व दंड वसुली इत्यादींच्या फाइल, अतिक्रमण कारवाईबाबतच्या फाइल इत्यादी बाबींचे मनपाकडे हस्तांतरण करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. या सर्व बाबींची तपासणी करून अहवाल तयार करण्यात येणार आहे. तपासणीचा अहवाल जिल्हाधिकार्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर २४ गावे मनपाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या बैठकीला मनपा व जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.