२.९७ लाख शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २४८ कोटींचा प्रस्ताव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:21 PM2019-11-13T12:21:29+5:302019-11-13T12:21:35+5:30
मदतीसाठी २४८ कोटी २४ लाख ७१ हजार ९८८ रुपये अपेक्षित मदत निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बुधवारी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अंतीम अहवाल मंगळवारी तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार ६६८ शेतकऱ्यांच्या ३ लाख ६५ हजार ६९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईपोटी शेतकºयांच्या मदतीसाठी २४८ कोटी २४ लाख ७१ हजार ९८८ रुपये अपेक्षित मदत निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बुधवारी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, ज्वारी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. त्यामुळे अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांचे उत्पादन बुडाले. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने शेतकरी संकटात सापडला. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या संयुक्त पथकांद्वारे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम ८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले. जिल्ह्यातील सातही तालुक्यातील पीक नुकसानाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील पीक नुकसानाचा एकत्रित अंतीम अहवाल १२ नोव्हेंबर रोजी तयार करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील १ हजार ४ गावांमध्ये २ लाख ९७ हजार ६६८ शेतकºयांचे ३ लाख ६५ हजार ६९ हेक्टर ४ आर क्षेत्रावरील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. पीक नुकसानाच्या अंतीम अहवालासह शेतकºयांना पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी २४८ कोटी २४ लाख ७१ हजार ९८८ रुपये मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत १३ नोव्हेंबर रोजी शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
पीकनिहाय असे आहे नुकसान!
अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात १ लाख ७३ हजार ४०५ हेक्टर सोयाबीन, १ लाख ५३ हजार ९५ हेक्टर कापूस, १ हजार ४६० हेक्टर तूर, १० हजार ८३४ हेक्टर ज्वारी, १०६ हेक्टर तीळ, २० हेक्टर मका आणि २६ हजार १४५ हेक्टर इतर पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
अधिकाºयांची घेतली बैठक!
जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल तयार करण्यासाठी मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी अधिकाºयांची बैठक घेतल्यानंतर जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला.