‘एमपीएससी’च्या परीक्षेला २४८३ परीक्षार्थी गैरहजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:23 AM2021-09-05T04:23:49+5:302021-09-05T04:23:49+5:30
अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) शनिवार ४ सप्टेंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. अकोला शहरातील ३३ उपकेंद्रांवर ...
अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) शनिवार ४ सप्टेंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. अकोला शहरातील ३३ उपकेंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेत जिल्ह्यातील ६ हजार २६९ परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली असून, २ हजार ४८३ परीक्षार्थी ‘एमपीएसएस’च्या परीक्षेला गैरहजर राहिले.
अकोला शहरातील ३३ उपकेंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत ‘एमपीएससी’ची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील एकूण ८ हजार ७५२ परीक्षार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होते. त्यापैकी ६ हजार २६९ परीक्षार्थींनी ‘एमपीएसी’ची परीक्षा दिली असून, उर्वरित २ हजार ४८३ परीक्षार्थी या परीक्षेला गैरहजर होते. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या मार्गदर्शनात परीक्षा नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी काम पाहिले. त्यांच्यासह समन्वय अधिकाऱ्यांनी शहरातील परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी करण्यात आली. परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. शहरातील सर्वच परीक्षा केंद्रांवर ‘एमपीएससी’ची परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडली.
परीक्षा केंद्रांवर करण्यात आल्या
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना !
‘एमपीएससी’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील परीक्षा केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये परीक्षेसाठी उपस्थित परीक्षार्थींसह परीक्षेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हातमोजे, मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड, इत्यादी साहित्य पुरविण्यात आले होते. तसेच परीक्षा केंद्रांवर आलेल्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले व परीक्षा केंद्र सॅनिटाईझ करण्यात आले होते.
.....................फोटो...................................