सराफा बाजार २५ कोटींचा!
By admin | Published: October 29, 2016 02:56 AM2016-10-29T02:56:41+5:302016-10-29T02:56:41+5:30
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर गर्दी; गत वर्षीच्या तुलनेत ग्राहकांचा प्रतिसाद वाढला
अकोला, दि. २८- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या धनत्रयोदशीच्या दिवशी अकोला सराफा बाजारात सकाळपासून सराफा बाजारात उसळलेली गर्दी संध्याकाळ पर्यत कायम राहिली. सराफा बाजारातील व्यापार्यांकडून रात्री घेतलेल्या आकडेवारीनुसार धनत्रयोदशीच्या एका दिवसात अंदाजे २५ कोटींची उलाढाल नोंदविली गेल्याची माहिती आहे.
बावणकंशी सोन्याची विक्री ही अकोल्याची वेगळी ओळख आहे. त्यामुळे जळगाव सोबतच अकोल्याच्या सोन्याच्या दागिन्यांना राज्यातच नव्हे, तर देशातही चांगला भाव मिळतो. त्यामुळे अकोल्यातून सोन्याचे दागिने खरेदी करायला अनेकांची पसंती असते. धनत्रयोदशीचा मुहरूत व घसरलेले सोन्याचे भाव यामुळे यंदाच्या दिवाळीत सोनं खरेदी करण्यास ग्राहकांनी विशेष पसंती दिली. शुक्रवारी सोन्याचे भाव ३0, ८00 रुपये (दहा ग्रॅम) होते. अकोल्यातील सराफा बाजारात लहान-मोठे १२0 दुकानदार आहेत.
लहानातून-लहान दुकानदाराने देखील शुक्रवारी एक लाखाच्या वरच व्यवसाय केला. त्यामुळे बुलेन (पीवर बिस्कीट) विक्रीची आकडेवारी वाढलेली होती. शहरातील मोठे शोरूम्स असणार्या ज्वेलर्समध्ये धनाढय़ खरेदीदारांची गर्दी होती, तर इतर लहान ज्वेलरी दुकानांत मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य खरेदीदारांनी गर्दी केली होती.
शहरातील मोठय़ा २0 सराफा व्यावसायिकांची उलाढाल कोट्यवधींच्या आकड्यात राहिली असल्याने धनत्रयोदीशीचा सराफा बाजार हा २५ कोटींच्या घरात असल्याचा दुजोरा सराफा व्यवसायातील तज्ज्ञांनी दिला आहे.
नाणे, शुद्ध सोन्याला जास्त मागणी
यंदाच्या सोने खरेदीत सोन्या-चांदीच्या नाण्यांना जास्त मागणी राहिली. सोबतच पीवर अर्थात शुद्ध सोने खरेदीला ग्राहकांची पसंती होती. त्यामुळे पीवर सोने विक्री करणार्या बुलेनची मागणी यंदा जास्त राहिली.
दिवाळ्याच्या पहिल्याच दिवशी तेजी आढळून आली. मागील वर्षांची तुलनादेखील यंदा करता येत नाही एवढी गर्दी होती सराफा बाजारातील प्रत्येक दुकानात सकाळपासूनच गर्दी कायम आहे. अकोला सराफा बाजारातील उलाढाल यंदा मोठी आहे यात शंका नाही
-प्रकाश सराफ, अध्यक्ष, सराफा असोसिएशन, अकोला.