शहर विकासासाठी २५ कोटी मंजूर
By Admin | Published: August 25, 2015 02:54 AM2015-08-25T02:54:59+5:302015-08-25T02:54:59+5:30
भाग्य उजळले; सिमेंट काँक्रीटचे रस्ते, बगिच्यांचे होणार सौंदर्यीकरण
आशीष गावंडे / अकोला : महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण व डांबरीकरणासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मनपासह राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यापासून प्रथमच अकोला शहरासाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी प्राप्त होणार असल्याचे दिसून येते. आमदार गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर यांना विशेष बाब म्हणून सदर निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी यांच्या कार्यकाळात २0१३ मध्ये अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या रस्ते दुरुस्तीसाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने १५ कोटींचे अनुदान दिले होते. या अनुदानातून प्रमुख १८ मार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. असे असले तरी शहरातील इतरही प्रमुख रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता, प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपये विशेष निधी देण्याची मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी अधिवेशनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. यासंदर्भात आमदार सावरकर यांनीही मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला. त्यानुषंगाने शहरातील रस्त्यांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अर्थमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला जून महिन्यात दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने विकास कामांचा प्रस्ताव तयार करून तो वित्त विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंमलबजावणी संचालनालय विभागाकडे पाठवला. प्रस्ताव मंजूर होऊन अर्थमंत्र्यांनी त्यावर शिक्कामोर्तब करीत २५ कोटींचा निधी मंजूर केला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रथमच विकास निधी मंजूर झाल्याने शहरातील उर्वरित विकास कामे मार्गी लागतील, हे निश्चित झाले आहे.