२५ अतिरिक्त शिक्षक निवडणूक विभागातील सेवेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 01:42 PM2019-01-25T13:42:07+5:302019-01-25T13:42:16+5:30
कामच नसलेल्या शिक्षकांवर अखेर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या २५ शिक्षकांना शाळा रुजू करून घेत नसल्याने त्यांच्या समायोजनाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
अकोला: माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ६२ शिक्षकांपैकी २५ शिक्षकांना शाळांनी रुजू करून न घेतल्यामुळे या शिक्षकांना ना शाळा राहिली ना शिकवायला विद्यार्थी. कामच नसलेल्या शिक्षकांवर अखेर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या २५ शिक्षकांना शाळा रुजू करून घेत नसल्याने त्यांच्या समायोजनाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
जिल्ह्यात माध्यमिक शाळांमधील ६२ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यापैकी सर्वच शिक्षकांचे समायोजन झाले. ३७ शिक्षक विविध शाळांवर रुजू झाले; परंतु उर्वरित २५ शिक्षकांना मात्र काही अडचणींमुळे शाळांनी रुजू करून घेतले नाही. त्यामुळे या शिक्षकांच्या अडचणी वाढल्या. शाळा, विद्यार्थी नसल्यामुळे या अतिरिक्त शिक्षकांना केवळ शिक्षणाधिकारी कार्यालयात हजेरी लावण्यापुरतेच काम उरले होते. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कामासाठी निवडणूक विभागाला मनुष्यबळाची गरज असल्याने, त्यांनी शिक्षण विभागाकडे विचारणा केल्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अतिरिक्त शिक्षकांची माहिती देण्यात आली. या सर्व २५ अतिरिक्त शिक्षकांची सेवा १४ जानेवारीपासून तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात संलग्न केली आहे. शिकविण्याचे काम करण्याऐवजी या अतिरिक्त शिक्षकांना तहसील कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहून नायब तहसीलदारांच्या मार्गदर्शनात निवडणुकीची कामे करावी लागत आहेत. निवडणुकीचे कार्यसुद्धा राष्ट्रहिताचे असल्यामुळे या सर्व शिक्षकांनी या कामाची जबाबदारी स्वीकारली आहे. (प्रतिनिधी)
या अतिरिक्त शिक्षकांची सेवा निवडणूक विभागात!
एम.एस. खंडारे, शारदा बायस्कार, वंदना गोटे, विजय गोटे, प्रतिभा अवताडे, अरविंद यादव, प्रकाश घाटोळ, सतीश गोकणे, देवीदास लाहोळे, स्नेहल यादव, विजय ढोणे, राम पोरे, सविता बाजपीय, अजित सपकाळ, प्रतिभा धोरण, सुभाष काकड, संजय राजहंस, नीलेश ढोकणे, सतीश राऊत, अरविंद मिश्रा, प्रशांत करांगे, राहुल भगत, अनिल घाटोळ, राजेश बरेठिया व आशिष गिरे या अतिरिक्त शिक्षकांची सेवा निवडणूक विभागात संलग्न करण्यात आली.