सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २५ टक्के अग्रीम!
By संतोष येलकर | Published: September 9, 2023 03:35 PM2023-09-09T15:35:54+5:302023-09-09T15:38:08+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना : ५२ महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकरी
अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सोयाबीन या अधिसूचित पिकाचा विमा काढलेल्या जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांतील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के अग्रीम रक्कम एका महिन्याच्या आत जमा करण्यात यावी, अशी अधिसूचना प्रभारी जिल्हाधिकारी बी. वैष्णवी यांनी शुक्रवारी जारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित विमा कंपनीने एका महिन्याच्या आत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त सोयाबीन पीक विमारधारक शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम रक्कम जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ज्या महसूल मंडळांत चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनात गत सात वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर पीक विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही अधिसूचना काढली आहे.
या ५२ महसूल मंडळांत अधिसूचना लागू!
अकोट तालुक्यातील अकोट, मुंडगाव, पणज, चोहोट्टा बाजार, कुटासा, आसेगाव बाजार, उमरा, अकोलखेड, तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा, माळेगाव बाजार, हिवरखेड, अडगाव बु., पाथर्डी, पंचगव्हाण, बाळापूर तालुक्यातील बाळापूर, पारस, व्याळा, वाडेगाव, उरळ, निंबा, हातरूण, पातूर तालुक्यातील पातूर, बाभूळगाव, आलेगाव, चान्नी, सस्ती, अकोला तालुक्यातील अकोला, घुसर, दहीहंडा, कापशी, उगवा, आगर, बोरगाव, शिवणी, पळसो, सांगळूद, कुरणखेड, कौलखेड, तसेच बार्शिटाकळी तालुक्यातील बार्शिटाकळी, महान, राजंदा, धाबा, पिंजर, खेर्डा आणि मूर्तिजापूर तालुक्यातील मूर्तिजापूर, हातगाव, निंभा, माना, शेलू बाजार, लाखपुरी, कुरूम, जामठी बु. इत्यादी ५२ महसूल मंडळांत ही अधिसूचना लागू होणार आहे.