२५ टक्के महिला मतदार करू शकतात दारूबंदी!
By admin | Published: May 6, 2017 02:55 AM2017-05-06T02:55:40+5:302017-05-06T02:55:40+5:30
महापालिका क्षेत्रातील दारू दुकान बंदीसाठी नियम; निवडणुकीद्वारे होईल आडवी बाटली!
अकोला: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थानांतरित झालेल्या दारूच्या दुकानांमुळे गोरक्षण रोड परिसरासह शहराच्या विविध भागात कायदा व सुव्यस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मनपा क्षेत्रातील संबंधित प्रभाग किंवा वार्डात २५ टक्के महिला मतदारांनी मद्यविक्री बंद करण्याचा निर्णय घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडे लेखी निवेदन दिल्यास मतदान घेता येईल. शासनाच्या अधिसूचनेमुळे दारू दुकानांचा वैताग आलेल्या अकोलेकरांनी आता मतदानासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महामार्गालगतच्या दारू विक्रेत्यांनी महामार्गापासून ५00 मीटर अंतरावर मद्यविक्रीची दुकाने थाटली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ लगतच्या दारू व्यावसायिकांनी त्यांची दुकाने गोरक्षण रोडवर स्थलांतरित केली. गोरक्षण रोडवर एकाच ठिकाणी मद्यविक्री होत असल्यामुळे या ठिकाणी मद्य विकत घेणार्यांची चांगलीच गर्दी उसळत असल्याचे चित्र आहे.
या प्रकारामुळे परिसरातील शाळकरी मुली, तरुणी-महिला, लहान मुलांची कमालीची कुचंबणा होत असून, स्थानिक रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गोरक्षण रोडवरील काही व्यावसायिक संकुलांमध्ये रेडीमेड कापड विक्रे ता, किराणा दुकान, भाजी विक्रे ता, फळ विक्रेत्यांसह हॉटेल व्यावसायिकांची प्रतिष्ठाने आहेत. नेमक्या याच व्यावसायिक संकुलांमध्ये दारूची दुकाने सुरू झाल्यामुळे महिलांनी व परिसरातील नागरिकांनी गोरक्षण रोडवरील दुकानांमधून साहित्य विक त घेणे बंद केल्याची परिस्थिती आहे. ही दुकाने बंद करण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. ही जमेची बाजू असली तरी संबंधित प्रभाग किंवा वार्डातील २५ टक्केपेक्षा कमी नसलेल्या महिला मतदार किंवा एकूण मतदारांनी त्या भागात मद्यविक्री बंद करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडे लेखी निवेदन दिल्यास संबंधित विभागाला मतदान घेणे क्रमप्राप्त आहे.
जिल्हाधिकारी साहेब, परवानगी देऊ नका!
प्रभाग तीन अंतर्गत येणार्या न्यू तापडिया नगर- खरप रोडवर देशी दारूचे दुकान सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे प्रलंबित आहे. या भागात शेतकरी, शेतमजुरांची मोठी संख्या आहे.
४देशी दारूची दुकाने सुरू झाल्यास अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होईल. तेव्हा जिल्हाधिकारी साहेब, अशा दुकानाला परवानगी देऊ नका, अशी भावनिक साद घालत भाजपच्या सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदन सादर केले आहे.
मनपा ठरवणार मतदानाची वेळ
४संबंधित प्रभागातील महिला किंवा एकूण मतदारांची मतदार यादी तपासून मतदान घेण्याची तारीख व वेळ ठरविण्याचे अधिकार महापालिका प्रशासनाला आहेत. तशी सूचना प्रभागात किमान सात दिवसांपूर्वी जाहीर करणे बंधनकारक आहे.
४मतदानाच्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक किं वा प्रतिनिधी मद्य विक्रेता किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.
मनपात दारूबंदीचा ठराव कधी?
विकास कामांसाठी अकोलेकरांनी महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात सोपवली. मद्यविक्रीच्या दुकानांमुळे गोरक्षण रोड परिसरातील सामाजिक स्वास्थ धोक्यात आले आहे. अशा स्थितीत महापौर विजय अग्रवाल दारूबंदीचा ठराव घेण्यासाठी विशेष सभेचे कधी आयोजन करतात, याकडे सुज्ञ अकोलेरांचे लक्ष लागले आहे.