अकोला जिल्ह्यात २५ हजारांवर विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा, जिल्ह्यात ११९ परीक्षा केंद्र
By Atul.jaiswal | Published: February 29, 2024 08:24 PM2024-02-29T20:24:13+5:302024-02-29T20:24:46+5:30
इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो.
अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून पुर्नपरीक्षार्थी आणि परीक्षार्थी असे २५ हजार ८७६ विद्यार्थी बसणार आहेत. इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो.
परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा कॉपीमुक्त करण्याकरिता तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू केला आहे. हा मनाई आदेश २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीत परीक्षा वेळेच्या १ तास आधी ते परीक्षा संपेपर्यंत लागू राहणार आहे. दहावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार घडू नयेत. या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयात, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, निरंतर आणि तहसील कार्यालयाची भरारी पथके तैनात करण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचावे. दहावीची बोर्ड परीक्षा १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत होणार असून, १३ हजार ५५४ मुले व १२ हजार ३२२ मुली अशा एकूण २५ हजार ८७६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत परीक्षा १० ते २९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आली.