सुपर स्पेशालिटीत होणार २५० खाटांचे कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 09:27 AM2021-05-08T09:27:33+5:302021-05-08T09:27:52+5:30
Akol Super specialty Hospital News : २५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना शुक्रवारी दिले.
अकाेला: जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. ही स्थिती पाहता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अकोल्यातील सुपरस्पेशालिटीमध्ये २५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना शुक्रवारी दिले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात ४५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू असून यापैकी ६० खाटा अतिदक्षता विभागासाठी आहेत; मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे रुग्णालय अपुरे पडत असल्याने तातडीने २५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिला. त्यासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीचा उपयोग करण्यात येणार आहे. या नियोजित कोविड रुग्णालयातील २५० खाटांपैकी ५० खाटा अतिदक्षता विभागासाठी असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. या कोविड रुग्णालयासाठी आवश्यक असणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच परिचारिका कंत्राटी तत्त्वावर नेमण्याचेही निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवरील मोठा ताण कमी होणार आहे.
५० व्हेंटिलेटरच्या खाटा वाढणार
प्रस्तावित २५० खाटांच्या कोविड रुग्णालयात ५० खाटा या अतिदक्षता विभागासाठी म्हणजेच व्हेंटिलेटरसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे आता व्हेंटिलेटरअभावी रुग्णांना जीव गमवावा लागणार नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही व्हेंटिलेटरची खाट रिक्त नसल्याने रुग्णांना हायफ्लो ऑक्सिजनवर ठेवण्यात येत आहे.