कोट्यवधी खचरूनही २६ पाणीपुरवठा योजना बंद!
By Admin | Published: June 23, 2016 12:49 AM2016-06-23T00:49:52+5:302016-06-23T00:49:52+5:30
दोन प्रादेशिक आणि २४ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांना मुहूर्त कधी हा प्रश्न अद्याप कायम आहे.
संतोष येलकर / अकोला
थकीत वीज देयक आणि देखभाल-दुरुस्तीअभावी कोट्यवधी रुपये खचरून बांधण्यात आलेल्या जिल्हय़ातील २६ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामध्ये दोन प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि २४ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. पाणीटंचाईच्या परिस्थितीत पाणीपुरवठा योजना बंद असल्याने, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या निधीतून प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात येतात. सन १९८५-८६ ते २0१0-११ या कालावधीत जिल्हय़ात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत बांधण्यात आलेल्या जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांपैकी सातही तालुक्यात २६ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. पातूर तालुक्यातील देऊळगाव-पास्टूल आणि आलेगाव-नवेगाव या दोन प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि २४ स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अशा २६ पाणीपुरवठा योजनांच्या कामांवर २६ कोटी ८७ लाख ५५ हजार रुपये खर्च करण्यात आले; परंतु संबंधित ग्रामपंचायतींकडून थकीत असलेले वीज देयक, देखभाल-दुरुस्तीचा अभाव, रखडलेले हस्तांतरण व नादुरुस्त झालेल्या योजना इत्यादी कारणांमुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या २६ ग्रामीण पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत.
ग्रामसभेच्या ठरावाअभावी दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद!
जिल्हय़ातील पातूर तालुक्यातील देऊळगाव-पास्टूल आणि आलेगाव-नवेगाव या दोन प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामांवर २२ कोटी ३0 लाख रुपयांचा मार्च २0१२ पर्यंत खर्च करण्यात आला. योजनांची कामे करण्यात आली; मात्र या दोन्ही पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असलेला ग्रामसभेचा ठराव अद्याप संबंधित ग्रामपंचायतींकडून देण्यात आला नाही. त्यामुळे या दोनही पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत.
स्वतंत्र पाणीपुरवठा योजना बंद पडलेली गावे!
अकोला तालुका: अमानतपूर ताकोडा, खरप खुर्द, कळंबेश्वर, दोनवाडा.
आकोट तालुका : आसेगाव बाजार, महागाव गडी.
बाळापूर तालुका : तामशी, चिंचोली गनूूू, सांगवी जोमदेव.
बाश्रीटाकळी तालुका : गोरव्हा, कातखेड, खांबोरा, साखरविरा, किनखेड, किनखेड बु.
तेल्हारा तालुका : दापुरा -निंबोळी, भिली-बोरव्हा, भोकर-काळेगाव, मनब्दा.
मूर्तिजापूर तालुका : गौलखेड, वडगाव, सांगवा मेळ, राजुरा सरोदे.
पातूर तालुका : नांदखेड.