पातूर तालुक्यातील २६ हजारांवर पशुधन वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:23 AM2021-08-14T04:23:11+5:302021-08-14T04:23:11+5:30
संतोषकुमार गवई पातूर: तालुका लघू पशुवैद्यकीय चिकित्सालयासह आलेगाव, गावंडगाव, सावरगाव, उमरा पशुधन विकास अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. ...
संतोषकुमार गवई
पातूर: तालुका लघू पशुवैद्यकीय चिकित्सालयासह आलेगाव, गावंडगाव, सावरगाव, उमरा पशुधन विकास अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी, तालुक्यातील २६ हजारांच्या वर पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पदे रिक्त असल्याने पशुपालकांना खासगी रुग्णालयात पशू उपचारासाठी न्यावे लागत असल्याने, आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांकडे गायी, बैल, म्हशी, बकऱ्या आदी पाळीव प्राणी आहेत. त्यांचे विविध साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी रोग प्रतिबंधक लसीकरण, कृत्रिम रेतन, गोचीड गोसावी निर्मूलन, चाराविषयक माहिती दूधवाढीसाठी प्रयत्न करणे आदी कार्यक्रम पशूसाठी, सातत्याने शासन स्तरावर राबविणे आवश्यक आहे. मात्र, पातूर, आलेगाव, सावरगाव, गावंडगाव आणि उमरा येथील पशुधन विकास अधिकारी श्रेणी-२, पशुधन पर्यवेक्षक ही पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे वेळेवर उपचार पाळीव प्राण्यांना मिळत नसल्याने, उपचाराअभावी सातत्याने तालुक्यातील पशुधन लाखांवरून केवळ २६ हजारांवर आले आहे. पशुवैद्यकीय दवाखाना आलेगाव सावरगाव गावंडगाव उमराव आणि तालुका लघू पशुचिकित्सालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी पशुपालकांकडून होत आहे.
-------------
या रुग्णालयातील पदे रिक्त
आलेगाव पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ पशुधन विकास अधिकारी पद एक वर्षापासून रिक्त आहे, सावरगाव येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पद सहा वर्षांपासून रिक्त आहे, गावंडगाव येथील पशुधन पर्यवेक्षक पद दोन वर्षांपासून पद रिक्त आहे, उमरा येथील पशुधन पर्यवेक्षक पद रिक्त आहे, उपरोक्त चार ही पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी डॉक्टर नसल्यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत.
-----------
बकऱ्या पाळण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र, वेळेत लसीकरण आणि उपचार मिळत नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
- गणेश वसतकार, शिर्ला.