अमरावती विभागात शेतकरी अपघात विम्याचे २६६ लाभार्थी

By admin | Published: March 5, 2016 02:28 AM2016-03-05T02:28:58+5:302016-03-05T02:28:58+5:30

२0१४-१५ या आर्थिक वर्षात अमरावती विभागात आलेल्या ३१९ प्रस्ताव.

266 beneficiaries of farmer accident insurance in Amravati division | अमरावती विभागात शेतकरी अपघात विम्याचे २६६ लाभार्थी

अमरावती विभागात शेतकरी अपघात विम्याचे २६६ लाभार्थी

Next

दादाराव गायकवाड/ कारंजा लाड (जि.वाशिम)
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, सर्पदंश, विषबाधा, वीज पडणे यामुळे मृत्यू ओढवला किंवा अपंगत्व आले, तर शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत सन २0१४-१५ या आर्थिक वर्षात अमरावती विभागात आलेल्या ३१९ प्रस्तावांतून २६६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
अपघातग्रस्त शेतकर्‍यास किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने ह्यशेतकरी अपघात विमा योजनाह्ण सुरू केली होती. या योजनेची मुदत ३0 नोव्हेंबर २0१५ रोजी समाप्त होण्यापूर्वी राज्य शासनाने या योजनेला दिवंगत केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला.
हा आर्थिक लाभ धनादेशाच्या स्वरूपात अपंग शेतकर्‍यास स्वत: किंवा मृत शेतकर्‍याची पत्नी, मुलगी, शेतकर्‍याची आई, मुलगा, नातवंडे यांना प्राधान्यक्रमानुसार देण्यात येतो. एकापेक्षा जास्त लाभधारक असल्यास अर्जदारास दुसर्‍या लाभधारकाचे नाहरकत शपथपत्र द्यावे लागते. विम्याचा दावा अपंग शेतकरी किंवा मृत शेतकर्‍याच्या लाभधारकास विहित नमुन्यात पुराव्याच्या कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकार्‍यांकडे सादर करावयाचा असतो.
अपघाताच्या स्वरूपानुसार काही दाव्यांत या व्यतिरिक्त अजून काही माहिती आवश्यक असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकार्‍यांनी केले आहे. संपूर्ण कागदपत्रासह हा दावा लाभधारकाने तालुका कृषी अधिकार्‍यांकडे दिल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कागदपत्रांची छाननी करून दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडे पाठवतात.

नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ!
शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू झाल्यास तसेच दोन डोळे, दोन अवयव किंवा एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास विमा रक्कम एक लाख रुपये आणि एखादा अवयव किंवा डोळा निकामी झाल्यास ५0 हजार रुपये आर्थिक लाभ मिळत होता. आता शासनाच्या नोव्हेंबर २0१५ च्या निर्णयानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार विमाधारक शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी तसेच अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी अशा तिन्ही प्रकारच्या हानीसाठी दोन लाख रुपये तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.

अमरावती विभागातील शेतकरी अपघात विम्याचे प्रस्ताव
जिल्हा            प्राप्त प्रस्ताव             मंजूर प्रस्ताव
बुलडाणा                   ७६                   ६७
अकोला                    ३५                   २८
वाशिम                     ३९                   ३४
अमरावती                ७३                     ६२
यवतमाळ                 ९६                    ४५
-----------------------------
एकूण                     ३१९                   २६६

Web Title: 266 beneficiaries of farmer accident insurance in Amravati division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.