२६७ परिचारिकांचे कामबंद; सायंकाळी आंदाेलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:15 AM2021-06-26T04:15:04+5:302021-06-26T04:15:04+5:30
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्य पातळीवर २१ जूनपासून आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये सुरुवातीचे दोन दिवस ...
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्य पातळीवर २१ जूनपासून आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये सुरुवातीचे दोन दिवस सकाळी आठ ते दहा असे दोन तास आंदोलन करण्यात आले. त्यानंतर २३ व २४ जूनला पूर्णवेळ संप आणि २५ जूनपासून दिवसभर कामबंद आंदोलन करण्यात आले. राज्यातील परिचारिका संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता द्या, कोविडकाळात सात दिवस कर्तव्यकाल व ३ दिवस अलगीकरण रजा कायम ठेवा, बंद केलेली साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी. केंद्र शासनाप्रमाणे परिचारिकांच्या पदनामात बदल करण्यात यावा. कर्नाटक राज्याने कोविडकाळातच परिचारिकांचे पदनाम बदलून त्यांना प्रोत्साहित केले त्याप्रमाणे महाराष्ट्रातील परिचारिकांचे पदनाम बदलण्यात यावे. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शासनमान्यता प्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिला जातो, तो थांबवावा. मृत परिचारिकांच्या कुटुंबीयांना विनाविलंब ५० लाख विमा व इतर सर्व देय आर्थिक लाभ देण्यात यावे. मृत परिचारिकांच्या कुटुंबीयांना शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्त्वावर प्राधान्याने नोकरी देण्यात यावी. यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. संघटनेच्या अध्यक्ष वंदना डामरे, उपाध्यक्ष प्रकाश नवरखेडे, सचिव सतीश कुरटवाड, सहसचिव सुमेध वानखेडे, राम राठोड, कोषाध्यक्ष मनोज चोपडे, सहकोषाध्यक्ष जया खांबलकर, योगेश राणे, संघटक स्वप्नील लामतुरे, प्रमोद चिंचे, संध्या उमाळे, सदस्य लता गोहत्रे, सुनीता उगले आदींच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले.