२७ कोटींच्या रस्त्याचे काम तीन वर्षांपासून पूर्ण होईना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:19 AM2021-05-06T04:19:32+5:302021-05-06T04:19:32+5:30
मुर्तिजापूर : शहरात सर्वात महत्त्वाचा वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे शिवाजी चौक ते जुन्या वस्तीकडे जाणारा महाराजा चौक आहे. मूर्तिजापूर ...
मुर्तिजापूर : शहरात सर्वात महत्त्वाचा वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे शिवाजी चौक ते जुन्या वस्तीकडे जाणारा महाराजा चौक आहे. मूर्तिजापूर शहराला जोडणारा हा मार्ग आहे. भाजप-शिवसेना युतीच्या काळात या मुख्य रस्ता निर्मितीस मंजुरी मिळाली. या मार्गाचे अंदाजपत्रक तयार करून २०१८ मध्ये या मुख्य मार्गाचे स्थानिक आमदारांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. परंतु तीन वर्षांमध्ये रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. रस्त्या निर्मितीचा कालावधीही संपला असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
गत तीन वर्षांपासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाला कालमर्यादा आहे की नाही हे समजायला मार्ग नाही. भूमिपूजन झाल्यानंतर या बांधकामाचे अंदाजपत्रक, कालावधी किती आहे आणि किती वर्षे देखभाल दुरुस्ती करणार व कोणत्या कंपनीकडे कंत्राट आहे, याचा फलक लावलेला नाही. बांधकाम सुरू झाले. रस्त्याची एक बाजू खोदून गिट्टीने भरण्यात आली. खोदलेल्या रस्त्याच्या कामात गिट्टी, मुरूम टाकण्यात आला. पहिला थर, दुसरा थर आणि तिसरा थर टाकण्यात आले. काँक्रीटच्या पहिल्या थरापासूनच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. पाण्याचा वापर नाही. बांधकामाचा कालावधी एक किंवा दोन वर्षाचा होत नाही, तोच रस्ता उखडायला लागला आहे. रस्त्यातील सिमेंटमधून गिट्टी उखडून बाहेर येत आहे. रस्त्यावर लोखंडी बॅरिकेडस लावून त्यावर बॅनर लावलेले आहेत. २७ कोटी रुपयांच्या रस्त्याचे बांधकाम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.
फोटो: मेल फोटोत
नगरपरिषदेने रस्ता मोकळा करून दिला नाही!
सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता म्हणतो, नगरपरिषदेने आम्हाला रस्ता मोकळा करून दिला नाही व नगरपालिका म्हणते हे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. त्यांनीच बांधकामात घाई केली. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रस्त्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी अजून किती कालावधी लागतो, हे कोणी सांगायला तयार नाही. या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तसेच स्थानिक आमदार सुद्धा शहर विकासाबाबत गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे. मात्र याची दखल घेण्यास कोणी तयार नाही. खूप मोठा मलिदा या बांधकामातून सर्वांनाच खायला मिळाला असल्याची चर्चा सुरू आहे मात्र वरिष्ठ स्तरावरून या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून त्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला न्याय द्यावा व भष्टाचारमुक्त रस्ता असे नाव त्याला द्यावे, अशी मूर्तिजापूर तालूक्यातील जनमानसात चर्चा सुरू आहे.