अकोला जिल्ह्यात २७ टक्के पाऊस कमीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 10:49 AM2020-10-05T10:49:12+5:302020-10-05T10:49:21+5:30
Weather news Akola २७ टक्के पावसाची तूट असल्याचे दाखविले आहे.
अकोला : जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत २७ टक्के पाऊस कमी झाल्याची नोंद भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. पातूर तालुक्यात मात्र सरासरीच्या १४ टक्के पाऊस अधिक झाला आहे. परतीचा पाऊस यावर्षीही लांबला असल्याची माहिती कृषी हवामान शास्त्रज्ञांनी दिली.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबरपर्यंतचा सरासरी पाऊस हा ६९३.७ मि.मी. आहे. गत ३० वर्षांच्या नोंदीनुसारी ही आकडेवारी आहे. यावर्षी प्रत्यक्षात ५०४.५ मि.मी. पावसाची नोंद केली आहे. या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट असल्याचे दाखविले आहे. कृषी विभागाने जिल्ह्यात ५८६.६ मि.मी. पावसाची नोंद केली आहे. या आकडेवारीनुसार पातूर तालुक्याची सरासरी ८०१.२ आहे. यावर्षी पातूर तालुक्यात ९१५.४ मि.मी. पाऊस पडला. ही टक्केवारी ११४.३ असून, येथे १४.३ टक्के पाऊस अधिक झाला आहे. बाळापूर तालुक्यातही सरासरी पाऊस पडला. या तालुक्याची ६१४.२ मि.मी. सरासरी आहे. प्रत्यक्षात ६१४.९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. म्हणजेच येथे १०१.१ पाऊस पडला आहे. इतर तालुक्यांपैकी अकोटची सरासरी ६७९.९ आहे. प्रत्यक्षात ५३९.८ मि.मी. नोंद झाली आहे. या तालुक्यात सरासरीच्या ७९.४ टक्के म्हणजेच २० टक्के पाऊस कमी झाला. तेल्हारा तालुक्याची सरासरी ६६४.५ मि.मी. आहे. प्रत्यक्षात ५८१.३ मि.मी. पाऊ स झाला हा पाऊस सरासरीच्या ८७.५ टक्के असून, १३ टक्के कमी झाला आहे. अकोला तालुक्याची सरासरी ७०३.४ मि.मी. एवढी आहे. या तालुक्यात प्रत्यक्षात ५३४.७ मि.मी. सरासरीच्या ७६ टक्के हा पाऊस असून, २४ टक्के कमी आहे.
मूर्तिजापूर तालुक्याचा सरासरी पाऊस ७११.२ मि.मी. आहे. यावर्षी प्रत्यक्षात ५२६.८ मि.मी. सरासरीच्या ७४.१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. या तालुक्यात सर्वाधिक २६ टक्के पावसाची तूट आहे.
अकोला व मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक तूट
जिल्ह्यात पातूर आणि बाळापूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाला असला तरी अकोला व मूर्तिजापूर तालुक्यात हा पाऊस कमी आहे. मूर्तिजापूर तालुक्यात २६ तर अकोला तालुक्यात २४ टक्के पावसाची तूट आहे.
परतीचा पाऊस लांबला!
यावर्षीही परतीचा पाऊस लांबला असून, येत्या १५ आॅक्टोबरनंतर परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविली आहे. विदर्भात मात्र येत्या दोन-तीन दिवस तरी पावसाची चिन्हे नाहीत, असे त्यांनी सांगितले.
बुलडाणा, वाशिमने सरासरी ओलांडली!
यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात ५ तर वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या १६ टक्के पाऊस अधिक झाला आहे.