राज्यात ‘नरेगा’ची २७ हजार कामे सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 10:34 AM2020-09-19T10:34:37+5:302020-09-19T10:35:30+5:30
या कामांवर १ लाख ४० हजार ७९२ मजूर काम करीत आहेत.
- संतोष येलकर
अकोला : पावसाळ्याचे दिवस आणि शेतीची कामे सुरू असली तरी, कोरोना संकटाच्या परिस्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) राज्यात सद्यस्थितीत २७ हजार ६८९ कामे सुरू असून, या कामांवर १ लाख ४० हजार ७९२ मजूर काम करीत आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाची कामे करण्यात येतात. पावसाळ्यात आणि शेतीची कामे सुरू असल्यास नरेगा अंतर्गत सार्वजनिक कामे बंद असतात आणि वैयक्तिक लाभाची कामे केली जातात. यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या वैयक्तिक लाभाची कामे सद्यस्थितीत केली जात आहेत. १८ सप्टेंबर रोजीच्या अहवालानुसार ‘नरेगा’ अंतर्गत राज्यभरात २७ हजार ६७९ कामे सुरू असून, या कामांवर १ लाख ४० हजार ७९२ मजूर काम करीत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात शेतीची कामे सुरू असली तरी, कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘नरेगा’ कामावर मजुरांची लक्षणीय उपस्थिती असल्याचे दिसून येत आहे.
सुरू असलेली अशी आहेत वैयक्तिक लाभाची कामे!
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सद्यस्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गुरांचे गोठे, नाडेप, वृक्ष लागवड, फळबाग लागवड, रोपवाटिका, घरकुल, शौचालय इत्यादी वैयक्तिक लाभाची कामे सुरू आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात सध्या २७ हजार ६८९ कामे सुरू असून, या कामांवर १ लाख ४० हजार ७९२ मजूर काम करीत आहेत. कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मागणी येताच मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
- ए.एस.आर. नायक
राज्य आयुक्त, मनरेगा